या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



भ्रमाविषयी एक बाब आपण स्पष्टपणे समजून घेतली पाहिजे. वेदांत्यांना ही भ्रमाची मीमांसा कितीही आवडो, पटो; हा सिद्धान्त नाट्यास्वादचंर्चेला उपयोगी पडत नाही. दोरीवर सापाचा नटावर रामाचा भ्रम होऊ शकेल. पण हे ज्ञान आहे. आस्वादातील प्रश्न समोरच्या रामाशी तादात्म्य पावून, भावप्रत्यय घेण्याचा आहे. तो भ्रमात बसत नाही. शिवाय शंकुकाने आधारासाठी बौद्धधर्मकीर्तीचा उल्लेख केला आहे. बौद्धच, चित्त प्रवाहधर्मी समजत. संस्कृत काव्यशास्त्राच्या विकासात बौद्धांचा एक महत्त्वाचा वाटा दिसतो. धर्मकीर्ती हा काव्यशास्त्रज्ञांच्या समोर अतिशय प्रतिष्ठित विचारवंत आहे. बौद्ध असल्याची शंकाही ज्यांच्याबाबत घेता येणार नाही, असे भट्ट तोत, महिम भट्टही आदरपूर्वक त्याचा आधार घेतात. शंकुक हा कदाचित बौद्धधर्मीय असेल, अगर नसेल, पण तो बौद्धन्यायाचे अनुसरण करणारा महत्त्वाचा लेखक मानला पाहिजे. चित्रतुरगन्याय हा बौद्धाचा अतिशय प्रसिद्ध न्याय आहे. शंकुक कोणत्याही न्यायपरंपरेत जावो, त्याला आत्मा आनंदमय आहे हे नाकारणे भागच होते.
 शंकुकाचा पक्ष, अनुमितीवादीपक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. विभाव, अनुभाव, व्यभिचारीभाव हे ज्ञापक आहेत, न्यायाच्या परिभाषेप्रमाणे लिंग आहेत, रससूत्र हे हया ज्ञापक सामग्रीचे वर्णन करणारे सूत्र आहे; संयोग हया ज्ञापक सामग्रीचा होतो; हया ज्ञापक सामग्रीमुळे अनुकार्यगत स्थायीभावाचे प्रेक्षकांना अनुमान होते; हा अनुमित स्थायी म्हणजेच रस, या पद्धतीने अनुमितीवाद मांडला जातो. ही पद्धत अर्वाचीन मंडळींचीच नसून उत्तरकालीन संस्कृत काव्य शास्त्रज्ञांची सुद्धा आहे. रसप्रदीपकार प्रभाकराने 'विभावादिभिनटेऽनुमीयमानोऽनुकार्यगो रत्यादिः स्थायीभावो रसः' असेच शंकुकाचे स्पष्टीकरण केलेले आहे. खरे म्हणजे हा एक लोकप्रिय गैरसमज मानला पाहिजे. शंकुक अनुमित स्थायीभावाला रस समजत नाही. तो अनकरणरूप स्थायीला, रस मानतो. हया गैरसमजाचे कारण मम्मटाच्या भाषाशैलीत आहे. मम्मटाने खरे म्हणजे शंकुक अनुमित स्थायीला रस मानतो असे मत दिलेले नाही. पण जे मत मम्मटाने दिले आहे त्याचा असा पुढिलांनी गैरसमज करून घेतला आहे. हया गैरसमजापोटी शंकुकावर एक कायम आक्षेप निर्माण झालेला आहे. हा आक्षेप असा की, अनुमानाने ज्ञान होईल, बोध होईल; काव्यानंद प्रतीती कशी निर्माण होईल? शंकुकाने रसनिष्पत्तीचा अर्थ रसाची अनुमिती असा केला आहे, हाही एक गैरसमजच आहे. शंकुकाच्या विवेचनात रस हा अनुमानाचा भाग नसून, प्रत्यक्ष ज्ञानाचा भाग आहे.
  मम्मटाने आपल्या विवेचनात सामाजिकांना वासनेमुळे चर्व्यमाण झालेला व वस्तुसैंदर्यबलाने रसनीयत्त्व पावलेला स्थायीभाव हाच रस आहे असे मत शंकुकाचे म्हणून नोंदविलेले आहे. हे मत देताना मम्मटासमोर, बहुधा अभिनवगुप्तांचे लोचनातील स्पष्टीकरण असावे. लोचनात अभिनवगुप्तांनी शंकुकाचे नाव न घेता जे स्पष्टीकरण


45