पान:राखेखालचे निखारे (Rakhekhalche Nikhare).pdf/४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मेंदूपर्यंत पसरतात आणि रोग्याच्या मनात त्यामुळे विनाकारणच काही तरी भव्यदिव्य करून दाखवावे अशी बुद्धी तयार होते. त्याकरिता आवश्यक तर हजारो नाही, लाखो लोकांचेही मुडदे पाडायला तो सहज तयार होऊन जातो. इतिहासात रशियातील पहिले तीन झार आणि अलीकडच्या इतिहासातील माओ त्से तुंग वगैरे पुढारी या वर्गात मोडतात. भारतातल्याही एका नामवंत पुढाऱ्याची गणना यातच होते. आपण अकबराचे अवतार आहोत अशी भावना करून घेऊन त्यापोटी सगळा देश लायसेन्स-परमिट-कोटा-इन्स्पेक्टर राज्यात बुडवणारे आणि इंग्रजांनी प्रस्थापित केलेली कायदा आणि सुव्यवस्था संपवून टाकणारे नेतेही या वर्गातलेच.
 या नेत्यांची आणखी एक उपपत्ती लावता येते. भारतीय परंपरेत युगांची कल्पना आहे. युग हा एक कालखंड असतो. सध्याचे युग हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये माणसे धर्मतत्त्व सोडून वागू लागतात, द्रव्य हीच केवळ श्रेष्ठत्वाची निशाणी ठरते. द्रव्य आणि सत्ता यांची साखळी जमली म्हणजे टगेपणाचाही खुलेआम अभिमान काही मंडळी बाळगतात हे आपण पाहिलेले आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, या कालखंडामध्ये काही पुढारी विनाकारणच प्रतिष्ठेचे स्थान प्राप्त करून जातात. 'पंडित नेहरू महाराष्ट्रापेक्षा मोठे आहेत' अशी उघडउघड घोषणा करणारे यशवंतराव चव्हाण आता सर्वकालीन थोर मंडळीत जाऊन बसले आहेत. त्यांच्या समाधिस्थानापुढे कोणी नाही तरी अजितदादांना तरी जाऊन आत्मचिंतन करावेसे वाटले यावरून कलियुगातील सत्ता आणि यश यांचे माहात्म्यही लक्षात येऊन जाईल. सध्याच्या पुढारी मंडळींत कोणीही आपले कार्यक्षेत्र विचारपूर्वक निवडल्याचे दिसत नाही. जन्माच्या अपघाताने जे हाती आले ते त्यांनी जोपासले. हे करताना आपल्या समाजाच्या विकासाचा तौलनिक अभ्यास न करता त्यांनी आरक्षणासारख्या मलमपट्टीचा पुरस्कार करून इतर समाजांत विनाकारण विद्वेष तयार केला. हा परस्परविद्वेषाचा कालखंड जोवर सत्तेतून पैसा मिळतो आणि पशातून गुंडशक्ती आणि सत्ताही मिळते तोपर्यंत चालूच राहील, असे देशाच्या दुर्दैवाने दिसते आहे.

(दै. लोकसत्ता दि. २९ मे २०१३ )

राखेखालचे निखारे / ५२