या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२
राज्य-शास्त्र

 (१७) विशेषतः समाजशास्त्रांत
 समाजशास्त्राला भौतिक शास्त्राचा दाखला अर्थातच देतां येत नाहीं. - कारण भौतिक पदार्थांचे गुणधर्म निश्चित स्वरूपाच असून त्यांचा हुकमी प्रयोग करून पाहतां येतो, त्याप्रमाणे समाजशास्त्रांत असे हुकमी प्रयोग करून पाहतां येत नाहींत. पण भौतिक शास्त्रांतहि जुने अनुभव लक्षांत घेऊन व पुढें कांहीं तरी कल्पना मनांत बसवून ( अनुभवाच्या साहाय्यानेंच पण थोडेसे अनमानधपक्यानेंच ) शास्त्रज्ञानी लोक प्रयोग करतात. समाज- शास्त्रांत व त्यांतील अंगभूत राज्यशास्त्रांतहि याच रीतीनें जुना इतिहास आधाराला घ्यावा लागतो, व मग अनुभवानें एखादी नवी कल्पना रचून अनुभवसिद्ध मार्गांनी ती अंमलांत आणण्याचा प्रयोग करावा लागतो. पण तो साधेलच अशी जामिनकी कोणी मागत नाहीं व कोणी देत नाहीं. अशी 'जामिनकी मिळती तर सुराज्याचा प्रश्न हटकून सुटून सगळे जग सुखी व संतुष्ट झालें असतें. पण " वांझोटी रडे, एकपुती रडे व सातपुती रडे " या म्हणीप्रमाणें, मात्र ती प्रत्येक वेगवेगळ्या कारणांकरितां रडते या न्यायानें, जगांतील कोणताहि समाज आज कमी अधिक असंतुष्टच आहे.
 (१८) रोज नवा शिधा, नवा स्वयंपाक
 कोणी जुन्या सुवर्णयुगांतील सुटसुटीत अल्पप्रमाण राज्यसंस्थांचा लोप झाला म्हणून ! कोणाचा खरा विश्वास एकतंत्री राजसत्तेच्या यशावरच आहे पण ती सत्ता आज लोपली म्हणून! आणि कोणी नवी लोकाधीन राजसत्ता अस्ति- • त्वांत आहे पण ज्याच्या हातीं ती सत्ता ते लोकच अपात्र नादान ठरू पाहातात म्हणून ! मिळून कोणाचेंहि समाधान नाहीं. मात्र सर्व गुण पूर्ण अशा राजसंस्थेचा शोध सुरूच आहे, प्रयोग होतच आहे, उलथापालथ होतच आहे. ताजव्याचें पारडें वरखालीं ढळतच आहे. आणि एकंदरीनें असा प्रकार चाललेला आहे की, अंधाऱ्या खोलींत लोकांना डोळे बांधून सोन्याचा गोळा हुडकून काढून हस्तगत करण्याकरितां सोडून दिलें आहे, पण कोणा दुष्टानें हळूच सोन्याचा गोळा तेवढा तेथून काढून लांबविला आहे. असें असून, शोध धांगडधिंगा, बदावदी, गर्दी, गोंधळ, मारामारी सुरूच आहे. पण हें सर्व आहे म्हणून शास्त्रविचार करण्याचा मोह कांहीं कोणाचा सुटलेला नाहीं.