पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/3

हे पान प्रमाणित केलेले आहे.




प्रो. गनडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश

असतों असें नाहीं. वाग्देवीचें मंदिर लुटण्याची निसर्गतःच ज्यास मोकळीक मिळाली आहे त्यांची आणि भाषेंतील इतर ग्रंथकारांची तुलना करूं लागल्यास पुष्कळ प्रसंगी 'घटानां निर्मातुत्रिभुवनविधातुश्च कलहः' असे म्हणण्याची पाळी आल्याखेरीज रहावयाची नाहीं. सारांश, देशांत संपत्ति कितीहि विपुल असली, तरी तिचा एके टिकाणीं ज्याप्रमाणे व्यवस्थित संग्रह करावा लागतो तद्वतच व्याकरणाच्या कसोटीस लावून शब्दरत्नें मोठ्या काळजीनें आणि व्यवस्थित रीतीनें संग्रहित करावीं लागतात. हें काम मोठ्या मेहनतीचें, विद्वत्तेचें, आस्थेचें आणि शोधपूर्वक विवेचनाचें असतें. भाषेचे घटकावयव काय, प्रसंगानुसार यौगिक किंवा व्युत्पत्तिदृष्टया समानार्थक शब्दांची रूट भाषेंत भिन्नार्थी योजना कशी करतात, त्यांतील भेदाभेद कोणते आणि ते पहिल्यापासून तसेच कायम आहेत, कीं भाषेच्या वाढीबरोबर बदलत चाललेले आहेत, नव्या कल्पना, नवे विचार भाषेमध्यें घेण्यास जीं द्वारें आहेत, तीं भाषेच्या अभिवृद्धीस पुरेशीं विस्तृत आहेत, की अधिक विस्तृत करावयास पाहिजेत, एकच भाषा बोलणारे परंतु निरनिराळ्या प्रांतांत रहाणारे अशा लोकांत प्रयोगांची किंवा शब्दांची निरनिराळीं स्वरूपें कशीं होतात, त्यांतील ग्राह्य कोणती आणि अग्राह्य कोणतीं, शुद्ध कोणतीं, अशुद्ध कोणतीं, इत्यादि अनेक गोष्टींचें धोरण ठेवून कोशकारांस आपलें काम करावे लागतें. संस्कृत भाषेत छप्पन कोश आहेत. पण त्यांत अमरकोपाचीच योग्यता कां विशेष धरली जाते, याचा ज्याने थोडाबहुत विचार केला असेल, त्यास आमच्या म्हणण्याचा प्रत्यय आल्याखेरीज रहाणार नाहीं. त्यांतून अलीकडे अलीकडे जगांतील सर्व भाषांचा अभ्यास पाश्चिमात्य विद्वानमहांत सुरू झाला असल्यामुळे निरनिराळ्या भाषेतील शब्दांची तुलना करणे हा कोशकारांस एक अधिक विषय झाला आहे; आणि सर्वांचा विचार करून स्वभाषेंत कोश करणें मोठ्या विद्वत्तेचेंच नव्हे, तर मोठ्या परिश्रमाचेंहि काम झाले आहे.

स्वभाषेंतल्या स्वभाषेंत कोशरचना असली तरी, कोशकारांस किती गोष्टींकडे लक्ष पुरवावें लागतें हें या गोष्टीवरून कळून येईल. परंतु एका भाषेंतील विचार जेव्हां दुसऱ्या भाषेंत उतरावयाचे असतात, तेव्हां कोशकारांस वरच्यापेक्षांहि अधिक परिश्रम करावे लागतात; इतकेंच नव्हे तर, एका भाषेच्या ऐवजीं दोन्ही भाषांचेहि पुरें ज्ञान त्यास असावें लागतें. तशांतून एक भाषा अभिवृद्धीच्या शिखरास पोहोंचलेली आणि दुसरीच्या अभिवृद्धीस नुकताच आरंभ झालेला, अशी स्थिति असेल तर मग काही विचारावयासच नको. कोणतीहि भाषा घ्या, त्यांतील शब्दसमूह ती भाषा बोलणाऱ्या लोकांच्या विचाराचे, ज्ञानाचे किंवा एकंदर समाजस्थितीचे चित्राप्रमाणें द्योतक असतात; किंबहुना एखाद्या तळ्यांत सभोंवारच्या वस्तूंचें जसें प्रतिबिंब पडतें त्याचप्रमाणें प्रत्येक देशांतील लोकांच्या आचारविचारांचें, धर्माचे, नीतीचें, तत्त्वज्ञानाचें, व्यापाराचे व समाजस्थितीचें चित्र त्यांच्या भाषेंत उतरलेले असतें असे म्हणण्यास काही हरकत नाहीं.'वाच्यार्था नियताः सर्वे वाङ्मला वाग्विनिसृताः' असें जें मनूनें म्हटले आहे ते अगदी यथार्थ आहे; व