पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/7

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रो. रानडे यांचा नवा इंग्रजी-मराठी कोश

असा नव्हे. संस्कृत भाषेंतहि सामी, तामरस इत्यादि शब्द किंवा ज्योतिषशास्त्रांतील जामित्र होरा, वगैरे शब्द परकीय आहेत ही गोष्ट सुप्रसिद्ध आहे; व इंग्रजी लोकांसहि त्याचप्रमाणे त्यांचा ज्या देशांशी संबंध आला त्या त्या देशांतील शब्द आपल्या भाषेच्या कोशांत सामील करून घ्यावे लागले आहेत. हाच मार्ग मराठी भाषेतहि स्वीकारण्यास काही हरकत नाही. मात्र तो स्वीकारतांना एवढी खबरदारी घेतली पाहिजे की, त्यामुळे मराठी भाषेचा मराठीपणा मोडणार नाही.

सारांश, प्रो. रानडे यांनी हा जो उद्योग आरंभिला आहे तो महाराष्ट्र-भाषेच्या अभिवृद्धीस अत्यंत आवश्यक आहे, हे कोणीहि सूज्ञ मनुष्य कबूल करील. गेल्या ३०-४० वर्षात मराठी भाषेस एक प्रकारचें नवीन स्वरूप प्राप्त झाले आहे; आणि त्यांत स्पेन्सरचे तत्त्वज्ञान, मिल्लचे अर्थशास्त्र, किंवा हक्स्ले, टिंडाल वगैरे आधिभौतिक शास्त्रावरील विचार येऊ लागले आहेत; एवढेच नव्हे तर, वनस्पतिशास्त्र यांवरहि पाश्चिमात्य ग्रंथांच्या साहाय्याने इकडे ग्रंथ होऊ लागले आहेत. या सर्व ग्रंथांतून आलेली परिभाषा एकवट करून पुढचा प्रगतीचा मार्ग दाखविणे हे भाषेच्या खऱ्या हितचिंतकाचे कर्तव्य होय; आणि ते काम प्रो. रानडे यांनी मोठासा आश्रय नसतांहि केवळ आपल्या हिमतीवर अंगावर घेतले हे त्यांस भूषणावह आहे. मराठी भाषेची वाढ अद्याप पुरी झाली नसल्यामुळे हा कोश आणखी २५-३० वर्षांनी पुनः सुधारावा लागेल हे उघड आहे. पण तेवढ्यानें प्रो. रानडे यांच्या ग्रंथाची योग्यता कमी होत नाही. करितां मराठी भाषेच्या हितचिंतकांकडून त्यांच्या परिश्रमाचे चांगले चीज होईल अशी आम्हांस आशा आहे. कँडी व मोल्स्वर्थ यांचे कोश जेव्हां बाहेर पडले तेव्हां त्यांस सरकारचा आश्रय होता, तशा प्रकारचा आश्रय हल्लींच्या ग्रंथास मिळणे अगदी योग्य आहे. पण हल्लींची परिस्थिति लक्षांत आणतां केवळ त्याच्यावरच अवलंबून रहाणे बरोबर होणार नाही हे आम्ही सांगावयास नको. कसेंहि असो; एवढी गोष्ट निश्चित आहे की, महाराष्ट्रभाषेच्या हितचिंतकांनी उदार आश्रय देऊन हे काम तडीस नेणे जरूर आहे. सुपर रॉयल अष्टपत्री साच्याच्या १४०० पानांचा कोश वर्गणीदारांस १० रुपयांस मिळेल हा काही लहानसहान लाभ नव्हे. कांहीं उदार गृहस्थांनी शंभर शंभर रुपये पहिल्याने कर्जाऊ देऊन त्या कृत्यास आश्रय दिला आहे. परंतु एवढा ग्रंथ छापण्यास सुमारे १५००० रुपयांहन अधिक खर्च येणार असल्यामुळे यापेक्षा जास्त आश्रय मिळणे जरूर आहे, व तो मराठी भाषेच्या हितचिंतकांकडून प्रो. रानडे यांस मिळेल अशी आम्हांस पूर्ण उमेद आहे. अशा प्रकारची मोठी कामें चांगल्या आश्रयाखेरीज होत नसतात, हे आम्ही सांगावयास नको; व आम्हांस अशी आशा आहे की, प्रत्येक इंग्रजी-मराठी जाणणारा या बड्या कोशाची एक प्रत घेऊन महाराष्ट्र-भाषेच्या अभिवृद्धीस मदत केल्याचे श्रेय घेतल्यावांचून रहाणार नाही. स्वभाषेच्या अभिवृद्धीस मदत करणे म्हणजे पुष्कळ अंशी स्वदेशाच्या अभिवृद्धीस मदत करण्यासारखेंच आहे, हें आम्ही सांगावयास नको.

-अग्रलेख, २७ ऑक्टोबर १९०३