पान:राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - जनजागरण कार्य.pdf/54

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक वेगळीच प्रचीती या सद्गुरू भजनावलीत आपल्याला येते. डोळ्यावाचून दृश्य पाहिल्याची ही अनुभूती आहे. दुसऱ्या एका भजनात सद्गुरु आपल्यावर रुसल्याची कल्पना त्यांनी केली. ते कीव भाकून म्हणतात, 'सद्गुरुराया! का रुसला बा, हीन दीन लेकरा?' मी तुझा महिमा ऐकून, तुझ्या जवळ घाबरा होऊन आलो आहे. प्रपंचातील अशांतता, आणि महाकठीण धारेचा, प्रत्यय मला आला आहे. त्यामुळे मला शांतता मिळत नाही, काम क्रोधांच्या उफाळणाऱ्या लाटांवर, आशा तृष्णांच्या गराड्यात मी सापडलो आहे. सत्संगतीची, माझ्या जीवाला ओढ लागलेली आहे. ही तळमळ व्यक्त करतांना, ते म्हणतात - 'का बघसी मम अंत, दयाळा? दे भक्तीचा झरा। तुकड्यादासा - तुझा भरवसा, अन्य नसे दुसरा।। सद्गुरू कृपेचे महत्त्व, संत तुकडोजी महाराजांनी पुरतेपणी जाणले होते. 'तोचि खरा रे। तो चि खरा, अव-तारु जनतेचा।' ही त्यांची श्रद्धा होती. निश्चयाचा, गुरुभक्तीचा भाव होता. 'सद्गुरुची निज दया व्हावया, फिरते मन माझे। काय करु साधना? कुणावर घालू मी ओझे?।। सर्व साक्षी सद्गुरु। तुम्हा का लागे सांगावे? असा निर्वाणीचा प्रश्न, ते आपल्या गुरुलाच विचारतात. आणि शेवटी म्हणतात - तुकड्यादास - ‘भाव जाणूनि, उचित प्रेम द्यावे।' सद्गुरूची करुणा भाकणारे, त्यांचे हे भजन. “सद्गुरूनाथा करि करुणा रे। कारण माझे हे, चंचल मन, (५३)