पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/173

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिक प्रतिनिधित्व असावे ह्या स्वरूपाच्या असत. सावरकरांनी मुसलमानांना अधिक प्रतिनिधित्व द्यायला या भाषणात विरोध केला आहे. माणशी एक मत या न्यायाने राज्यकारभार चालला पाहिजे असे ज्या त-हेने आपण म्हणतो त्या त-हेने (अखंड भारतातील) त्यांनी पंचवीस टक्के मुसलमानांना पंचवीस टक्केच प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे असे आग्रहाने म्हटलेले आहे. भारत सर्वधर्मीयांचे होईल, प्रत्येकाला त्यात समान अधिकार राहील असेही त्यात म्हटले आहे. परंतु पुढे त्यांनी गंमतीदार घोटाळे केले आहेत. ते म्हणतात की, हे 'हिंदुराष्ट्र' होईल आणि 'सीमा' प्रांताच्या (त्या वेळच्या वायव्य सरहद्द प्रांताच्या) अफगाण सीमेवर अफगाणांनी (म्हणजेच मुसलमानांनी) पठाणांनी भारताविरुद्ध उठाव करू नये म्हणून या हिंदुराष्ट्राचे सामर्थ्यवान हिंदुसैन्य सीमेवर सुसज्ज असेल.

 येथे काही प्रश्न मनात उपस्थित होतात. व्यक्तींची समानता असणारे हिंदुराष्ट्र होणार होते म्हणजे काय होणार होते? सीमेवर हिंदुसैन्य उभे राहणार होते म्हणजे मुसलमानांना सैन्यात प्रवेश नव्हता काय? असे असल्यास ते व्यक्तींच्या समानतेचे राज्य कसे होते? लोकशाही राज्यव्यवस्था होणार होती की नाही? अखंड भारतात पाच मुस्लिम बहुसंख्यांक प्रांत राहिले असते. यामुळे तेथील कारभारात स्वाभाविकपणे मुसलमानांचा वरचष्मा असता. या पाच प्रांतांत लोकमतानुसार कारभार चालणार होता की मध्यवर्ती प्रबळ हिंदू सरकारचा कारभार राहणार होता? भारताची राज्यव्यवस्था कोणत्या स्वरूपाची असणार होती? या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे स्वरूप कोणते राहणार होते? सावरकरांनी अनेकदा विज्ञानावर भर दिलेला आहे. परंतु राष्ट्रउभारणीच्या संदर्भात औद्योगिकीकरणाला फार महत्त्व प्राप्त होते आणि त्यांच्या सर्व लिखाणात औद्योगिकीकरणाचा, शेतीविकासाचा आणि अर्थविषयक बाबींचा उल्लेखही आढळत नाही आणि तरीही सावरकर 'भारताने एक कोटीचे सैन्य उभारले पाहिजे' असे म्हणत. आज जगात कोणत्याही राष्ट्राने एवढे प्रचंड सैन्य उभे केलेले नाही. अगदी शीतयुद्धाच्या तणातणीच्या काळात रशिया व अमेरिकेचे सैन्य अनुक्रमे चाळीस लाख व सत्तावीस लाख असे होते. आणि औद्योगिकदृष्ट्या ही दोन जगांतील बलाढ्य राष्ट्रे आहेत हे ध्यानात घेतले पाहिजे. चीनची लोकसंख्या आपल्यापेक्षा अधिक आहे. आणि तरीही चीनचे सैन्य आज चाळीस लाखांच्या आसपास आहे. एकूण, एक कोटी सैन्य भारताने कसे उभे करायचे? त्यांना अन्न कोठून द्यायचे? त्यांना शस्त्रे कोठून आणायची? सावरकरांना या प्रश्नांची उत्तरे देण्याची गरज कधी भासली नाही, कारण त्यांचे राखीव अनुयायी त्यांच्या विधानांवर टाळ्या पिटीत राहिले. त्यांनी कधी सावरकरांनी मांडलेल्या विचारांच्या शक्याशक्यतेचा विचारच केलेला नाही. या देशाची अर्थव्यवस्थाच अप्रगत अवस्थेत होती आणि आजही ती काहीअंशी तशी आहे. तिला गती आणणे हाच देशाला सामर्थ्यवान करण्याचा एकमेव मार्ग आहे. अमेरिकेची ताकद अमेरिकेच्या अफाट शेती उत्पादनात आणि औद्यागिक शक्तीत आहे. अमेरिकेचे सैन्य हे त्या औद्योगिक आणि शेतीविषयक ताकदीचे प्रतीक आहे. केवळ सैन्य वाढवून देश सामर्थ्यवान होत नाही. स्वयंभू अर्थव्यवस्था निर्माण केल्यानेच देश सामर्थ्यवान होईल हे सावरकरांना कधी उमगलेच नाही.

१७२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान