पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/176

हे पान प्रमाणित केलेले आहे.

जाणवली नाही. एकदा डॉ. आंबेडकरांनी मुसलमान होण्याची धमकी दिली. सावरकरांनी त्यांना मुसलमान होण्यापासून परावृत्त करण्यासाठी जे पत्र लिहिले ते मासलेवाईक आहे. या पत्रात सावरकरांनी इतिहासातील एका घटनेचा दाखला दिला आहे. कुठल्या तरी मुस्लिम राजाने केलेल्या आक्रमणाच्या वेळी हिंदूधर्मरक्षणार्थ हरिजन कसे बेभान होऊन लढले याचे त्यात रसभरित वर्णन आहे. वस्तुत: हरिजन हे हिंदूंचे गुलाम होते. या गुलामांनी केलेल्या हिंदुधर्माच्या रक्षणाची फुशारकी सावरकरांनी मारावी ही खरी गंमत आहे. हरिजनांनी ब्राह्मणांच्या लढाया लढवाव्यात आणि त्यांच्या दास्यमुक्तीसाठी कोणी टाहो फोडला तर त्याला सबुरीचा सल्ला द्यावा असा हा खास ब्राह्मणी खाक्या होता.
 सावरकरांचा प्रभाव आता वैचारिकदृष्ट्या महाराष्ट्रात ब्राह्मणवर्गापुरता मर्यादित राहिला आहे. त्यांनी गोहत्येचे समर्थन केले होते. रत्नागिरीच्या स्थानबद्धतेच्या काळात सामाजिक सुधारणेचे काही लेख त्यांनी लिहिले. त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या सामाजिक सुधारणेचे कार्य जरी अंगीकारले तरी त्यांचे ऋण त्यांनी फेडले असे होईल. परंतु तसे होत नाही. आज त्यांचेच अनुयायी गोहत्याबंदीची चळवळ करताना दिसत आहेत. सावरकरांचे हे खरे अपयश आहे. कारण त्यांच्या मागे येणारी मंडळी तशी विज्ञाननिष्ठ नव्हतीच. सावरकरांच्या मुस्लिमविरोधामुळे ही सनातनी मंडळी सावरकरांकडे आकर्षित झालेली होती. त्यांना सावरकरांच्या इतर कार्याचे काही अगत्य नव्हते. यामुळे जनसंघाला पुढे महाराष्ट्रातील ब्राह्मणांत प्रचंड प्रमाणात रंगरूट मिळावयास सावरकरांचे तत्त्वज्ञान उपयोगी पडले.

 वस्तुस्थिती अशी आहे की सावरकरांची विज्ञाननिष्ठा ही हिटलरच्या जातीची होती. जीनांची तथाकथित आधुनिकतादेखील याच जातीची होती. दुसऱ्यावर मात करणे, दुसऱ्यांना आपल्या धाकाखाली नमविणे याकरिता त्यांना शास्त्रांचा आणि ज्ञानाचा उपयोग करून घ्यायचा होता. कोणीतरी प्रबळ असणारच असेल आणि सबळ दुर्गुणांवर मात करतात असे असेल तर आपण सबळ का होऊ नये असे सावरकरांनी कित्येकदा म्हटले आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे उदाहरण त्यांनी कित्येक वेळा दिलेले आहे. मोठा मासा छोट्या माशाला गिळतो हे खरे. परंतु माणूस म्हणजे मासा नव्हे. माशांचे नियम माणसाला लावता येत नाहीत हे सावरकरांना कळलेले नाही. जगात समतेचा, न्यायाचा जो प्रवाह आहे त्याविरुद्धच हे सावरकरांचे तत्त्वज्ञान होते. पेशवाईच्या इतिहासाचा अहंकार बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाने आत्मसात केलेली ही आधुनिकता म्हणून दुटप्पी आहे. तो मांसाहार करतो-नव्हे बाहेर क्वचित काही ब्राह्मण गोमांसही भक्षण करतात. जनसंघाच्या सनातन धर्मप्रवृत्तीवर क्वचितच त्याचा विश्वास असेल. कुठलीच व्रतवैकल्ये तो करीत नाही आणि एक ऋचादेखील त्याला म्हणता येत नाही आणि तरीही महाराष्ट्रात जनसंघाचा तोच अनुयायी आहे. ही दुटप्पी आधुनिकता हा सावरकरांनी महाराष्ट्राला दिलेला वारसा आहे. एका परीने सुशिक्षित मुसलमान नमाज पढत नाहीत, धर्म जाणत नाहीत आणि कमालीचे हिंदुद्वेषी आहेत, त्याच्याशी महाराष्ट्रातील या ब्राह्मणवर्गाचे साम्य आहे. एक वर्ग जीनांची भलावण करतो तर दुसऱ्याची सावरकरभक्ती जाणवण्यासारखी आहे. (मी ब्राह्मणद्वेष्टा आहे

हिंदुत्ववाद/१७५