पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/198

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही व डाव हुकला. पाकिस्तानातील सरकारे लोकशाहीवादी कधीच नव्हती. अनेकदा अमेरिकाच पाकिस्तानचे सत्ताधीश ठरवीत असते. उदाहरणार्थ महमदअली बोगरा हे पाकिस्तानचे अमेरिकेत राजदूत होते. नाझिमुद्दिन यांना बडतर्फ करून महमदअली यांना पंतप्रधान करण्यामागे अमेरिकेचा हात होता हे आता पुरेसे सिद्ध झालेले आहे. याच महमदअलींच्या काळात अमेरिकेबरोबर पाकिस्तानचा लष्करी करार झालेला आहे. याच कराराचे स्वतंत्र पक्ष अमेरिकेच्या वतीने समर्थन करीत आलेला आहे.
 व्यक्तिस्वातंत्र्यावर आधारलेल्या समाजव्यवस्थेला अमेरिकन्स आदर्श मानतात. अमेरिकेचे सर्व आदर्श स्वीकारण्याची चूक स्वतंत्रांनी केली, त्याचप्रमाणे पाकिस्तानी राज्यकर्त्यांचे मनोगत नीट न समजून घेण्याची चूकही त्यांनी केली आहे. उदारमतवादी परंपरेत वाढलेल्या या नेत्यांनी पाकिस्तानचे नेतेदेखील आपल्यासारखीच उदारमतवादी मूल्ये मानतात असे समजण्याची दुसरी चूक केली आहे. म्हणूनच श्री. पिलू मोदी यांच्यासारखे स्वतंत्र नेते भुत्तोंशी असलेल्या त्यांच्या मैत्रीवरून भुत्तोंना भारताशी मैत्री करण्याची इच्छा असल्याचे चुकीचे मत गृहीत धरतात. इतिहासाचे जनमनावरील ओरखडे स्वतंत्रांनी कधी समजावून घेतले नाहीत. पाकिस्तानी नेत्यांच्या प्रादेशिक आकांक्षांचे त्यांना आकलन झालेले नाही.
 स्वतंत्र पक्ष आता भारतीय राजकारणात फारसा उरलेला नाही. त्या पक्षातील काही .क्ती अधूनमधून पाकिस्तानबरोबर तडजोडीच्या गोष्टी बोलत असतात. बांगला देशाच्या उदयानंतर त्यांना आपली भूमिका चुकली असल्याचे जाणवले असावे असे वाटते.
 विरोधी पक्षांपैकी समाजवादी पक्षाने मुस्लिम प्रश्न व भारत-पाकवाद यांच्यावर सातत्याने काही भूमिका घेतली आहे. उदारमतवादी दृष्टिकोन बाळगणाऱ्या या पक्षाने मुस्लिम अल्पसंख्यांकांच्या बाबतीत उदार धोरण स्वीकारावे याबद्दल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. दंगली झाल्या असता त्या शमविण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते व कार्यकर्ते नेहमी आघाडीवर राहिले आहेत. पाकिस्तानबाबतदेखील भारताने तडजोड करावी अशी भूमिका घेतली आहे. समाजवादी नेत्यांपैकी (कै.) डॉ. राममनोहर लोहिया यांनी या प्रश्नाचा अधिक सखोल विचार केला आहे. आणि त्यांना मानणाऱ्या समाजवादी पक्षातील कार्यकर्त्यांनी या प्रश्नावरील त्यांची भूमिका स्वीकारली आहे.
 येथे हे लक्षात ठेवले पाहिजे की समाजवादी पक्ष १९४८ पर्यंत काँग्रेस पक्षात होता. स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेस-लीग तणाव असताना या पक्षाच्या नेत्यांनी हिंदु-मुस्लिम प्रश्नाकडे फारसे लक्ष दिलेले नाही. नाही म्हणायला 'जातीय त्रिकोण' या नावाचे एक पुस्तक श्री. अच्युत पटवर्धन व श्री. अशोक मेहता यांनी संयुक्तपणे या काळात लिहिले आहे. हिंदमुसलमान आणि ब्रिटिश असा हा त्रिकोण आहे आणि ब्रिटिश सत्ता येथून नष्ट झाल्याखेरीज हा प्रश्न सुटणारा नाही असे त्यात प्रतिपादन करण्यात आलेले आहे.

 वस्तुत: ब्रिटिशांमुळे ही तेढ राहिलेली आहे किंवा निर्माण झालेली आहे हा विचार तसा नवा नव्हता. गांधीजींनी हिंदु-मुस्लिम ऐक्य हे स्वराज्य मिळविण्यासाठी आवश्यक आहे असे खिलाफतच्या काळी म्हटले होते. त्यानंतर खिलाफतचे दंगे झाले आणि लीगबरोबर

समारोप /१९७