पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/29

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 नादीरशहाने मुसलमानांचीही कत्तल केली, तसे करू नये असेही वलिऊल्लाने अब्दालीला आवर्जून सांगितले आहे. अब्दालीच्या स्वारीमागे वलिऊल्लाचा आग्रह होता की काय हे सांगणे कठीण आहे. काही ऐतिहासिक माहितीवरून तसे वाटत नाही. कारण भारतात आल्यानंतर युद्ध शक्यतो टाळण्याचेच प्रयत्न अब्दाली करीत होता. सिरहिंदपर्यंतच्या प्रदेशावरील त्याची अधिसत्ता मराठ्यांनी मान्य केल्यास अलीकडील प्रदेशावर मोगलांचे वतीने मराठ्यांनी कारभार करावयास त्याची हरकत नव्हती आणि युद्धानंतर जाटांच्या दरबारातील पेशव्यांच्या वकिलापाशी नानासाहेबांना त्याने सांत्वनाचा निरोपही पाठविला. (“आपल्या पुत्राला आणि बंधूंना ठार करण्याचे माझ्या मनात कधीच नव्हते. युद्ध करण्याखेरीज त्यांनी माझ्यापुढे दुसरा पर्याय ठेवला नाही." - यदुनाथ सरकार यांचे पुस्तक.)त्याच्या स्वारीमुळे भारतातील मुसलमानी सत्ता सावरली तर नाहीच, उलट अधिक खिळखिळी झाली. तो येथे राज्य करायलाही राहिला नाही. मोगल साम्राज्याची शकले झाली. उत्तर भारतात, विशेषत: पंजाबात, शिखांची सत्ता उदयाला आली आणि ब्रिटिश सत्तेचे आगमन झाले. वलिऊल्लासारख्या धार्मिक नेत्याच्या दृष्टीने सत्ता हिंदूंच्या हातात जाणे किंवा ब्रिटिशांच्या हाती जाणे सारखेचा होते. १८०५ साली ब्रिटिशांनी शिंद्यांचा पराभव केला. मोगलांच्या वतीने शिंदे तेव्हा कारभार करीत असल्यामुळे दिल्लीच्या बादशहावर ब्रिटिशांचा अंकित होण्याची पाळी आली. वकिऊल्लाचा पुत्र शाह अब्दुल अझिज यांनी 'हा देश आता दारूल हर्ब (काफिरांचा प्रदेश) झाला आहे' असा फतवा काढला. (शिंदे कारभार करीत असताना हा प्रदेश दारेसलाम (इस्लामचा प्रदेश) होता असे शहा अब्दुल अझिज मानत होता. याचे कारण त्यानेच फतव्यात दिले आहे. तो म्हणतो, "दिल्ली या राजधानीत मुसलमानांना काफिरांच्या (म्हणजे ब्रिटिशांच्या) परवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही. त्यांना लवून नमस्कार करावा लागतो. असे अजूनपर्यंत कधीच घडले नव्हते." झेड. एच. फारूखी : पुस्तक.) मुसलमानी धर्मनेत्यांच्यानुसार या देशाला पुन्हा दारेसलाम बनविण्याचे कार्य आता सुरू झाले. १८५७च्या बंडात मुसलमानांनी जो प्रचंड प्रमाणात भाग घेतला. त्याची प्रेरणा ही अशी धर्मनिष्ठ होती. त्यापूर्वी सय्यद अहमद बरेलवीने शिखांच्या विरुद्ध धर्मयुद्ध घोषित केलेच होते. बरेलवीने शिखांच्या विरुद्ध लढणे ब्रिटिशांना सोयीचे होते आणि म्हणून त्यांनी त्याला गुप्तपणे साहाय्यही केले. बरेलवीने पेशावरला जाऊन सैन्य जमविले आणि आपण खलिफा असल्याचे घोषित केले. परंतु १८३१ साली पेशावरनजीक बालाकोट येथे झालेल्या युद्धात शिखांनी त्याचा पराभव केला. या युद्धात बरेलवी ठार झाला. पुन्हा इस्लामी राज्य स्थापन करण्याचे धार्मिक नेत्यांचे सशस्त्र प्रयत्न येथेच संपले. १८५७ मधील उठावाचे स्वरूप अधिक व्यापक राहिले. बरेलवीच्या मृत्यूनंतर धार्मिक नेत्यांनी आपला मोहरा बदलला. सशस्त्र उठाव करण्याचे उद्दिष्ट त्यांनी सोडून दिले आणि मुसलमानी समाजाला संघटित आणि शिक्षित करण्याकडे आपले लक्ष वेधले. याच प्रयत्नातून देवबंद येथील इस्लामी धर्मपीठाची स्थापना (इ.स. १८६७) झाली.

 या धार्मिक नेत्यांनी सांगितलेली भारतातील मुसलमानी सत्तेची अस्त होण्यामागील कारणपरंपरा एकदा नीट समजून घेणे आवश्यक आहे. या कारणपरंपरेतूनच मुसलमानी

२८/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान