पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/68

हे पान प्रमाणित केलेले आहे.

अधिकार आहे की नाही? असे अनेक प्रश्न इक्बाल यांच्या धार्मिक दृष्टिकोनातून निर्माण होतात. त्यांची उत्तरे त्यांनी दिलेली नाहीत.
 इक्बाल आधुनिक होते असे म्हटले जाते. इस्लामचे आधुनिक भाष्यकार म्हणून भारतीय आणि पाकिस्तानी मुस्लिम लेखक त्यांचा उदोउदो करीत असतात. इक्बाल यांच्यातील नेमकी आधुनिकता त्यांच्या पाश्चात्त्य वेषाखेरीज कोणती होती हे या मुस्लिम लेखकांनी एकदा सांगितले तर बरे होईल. त्यांनी बुरख्याचे समर्थन केले आहे. पाश्चात्त्य संस्कृतीची निंदा केली आहे आणि जमाते-इस्लामचे संस्थापक मौ. मौदुदी यांचे समर्थन केले आहे. राष्ट्रवादाची त्यांनी निर्भर्त्सना केली, परंतु त्याचबरोबर मुस्लिम राष्ट्रवादाचा पुरस्कार केला आहे.
 वेषाने आधुनिक असलेले इक्बाल मनाने कमालीचे संकुचित आणि सनातनी कसे होते हे त्यांनी अहमदियाविरोधी घेतलेल्या भूमिकेत दिसून येते. अहमदिया पंथाचे संस्थापक मिा बशीर अहमद यांनी आपण पैगंबर असल्याचे जाहीर केले. त्यांनी 'जेहादची घोषणा आता रद्द झाली आहे' असे म्हटले. अहमदियांविरुद्ध इक्बालने लाहोर येथून प्रचंड आघाडी उघडली. अहमदिया पंथाचे कडवे विरोधक आणि जमाते-इस्लामीचे संस्थापक मौ. मौददी यांना त्यांनी लाहोरला बोलावून आपल्या कॉलेजात आश्रय दिला. इक्बालनी अहमदियाविरोधी वातावरण असे तापविले की मुसलमान व अहमदिया यांच्यात तंग वातावरण निर्माण झाले. नेहरुनी इक्बालना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप केला आणि प्रक्षोभक लिखाण न. करण्याची विनंती केली. (पहा - मुनीर अहवाल, पृ. २५९., Selected Works of Jawaharlal Nehru, Vol. VI, S Gopal (Ed), pp468 - 479. Report of the Court of Enquiry Constituted under Punjab Act II of 1954 to enquire into the Punjab Disturbances of 1953, Govt. Printing Press, Lahore, 1954.)
 मुसलमानांच्या वेगळ्या राष्ट्राच्या कल्पनेला अधिक आकार चौधरी रहिमतअली या इंग्लंडमध्ये शिकत असलेल्या मुस्लिम विद्यार्थ्यांने दिला. पाकिस्तान हा शब्ददेखील त्यानेच प्रथम वापरला. पंजाब, सरहद्द (अफगाण प्रांत) काश्मीर, सिंध इत्यादी प्रांतांच्या आद्याक्षरांवरून पाकिस्तान हे नाव त्यांनी प्रचारात आणले. 'नाऊ ऑर नेव्हर' या शीर्षकाखाली लिहिलेल्या एका पुस्तिकेत पाकिस्तानची कल्पना त्यांनी १९३४ साली मांडली. मुसलमान नेहमी करीत असलेला युक्तिवाद त्यात होता. भारत हे एक राष्ट्र नाही. भारतीय मुसलमान हे सर्वार्थाने वेगळे राष्ट्र आहे इत्यादी विधाने त्यात करण्यात आलेली आहेत. जीनांनी १९४० मध्ये या योजनेत थोडी भर घातली. त्यांनी मुस्लिम बहुसंख्यांक प्रांतांचे वेगळे राष्ट्र मागितले. त्यामळे संकल्पित मुस्लिम राष्ट्रात आता बंगालचाही समावेश झाला.

 सरदार महमद गुलखान यांनी प्रथम केलेल्या मागणीपासून वेगळ्या राष्ट्राच्या ह्या मागणीत एक निश्चित सूत्र दिसून येते. ही मागणी करताना त्यांची हिंदंबद्दल काही तक्रार नव्हती. हिंदू आणि आम्ही एकत्र नांदू शकणार नाही असे त्यांचे म्हणणे होते. इक्बाल यांनीदेखील हिंदूंबद्दल तक्रारी केलेल्या नाहीत. मुसलमानांचे कायदे मुसलमानच करू शकतात, मुसलमानांवर सत्ता मुसलमानच गाजवू शकतो. राज्य आणि धर्म यांची मुसलमान फारकत करू शकत नाहीत. म्हणून त्यांचे वेगळे राष्ट्र होणे आवश्यक आहे, असे इक्बाल यांचे म्हणणे

पाकिस्तानची चळवळ/६७