पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/7

हे पान प्रमाणित केलेले आहे.

further from the God." पोपशाहीने ख्रिश्चॅनिटीचे रूपांतर चर्च्यानिटीमध्ये केले. महावीरांचा जैन धर्म अपरिग्रहवादी होता तर आता जैन धर्म परिग्रहवादी बनला. चातुर्वर्ण्यविरोधी असलेल्या जैन व बौद्ध धर्मांत जातीयता शिरली व साधूंचे महत्त्व प्रस्थापित झाले. तीच गोष्ट इस्लामबाबतही घडली. म्हणून मुस्लिम समाजात धर्मसुधारणा व प्रबोधन या चळवळींची नितांत गरज आहे व त्यातील साचेबंदपणा नष्ट करायला हवा असे मत हमीद दलवाईंनी केवळ निर्भीडपणेच नव्हे तर जिवावर उदार होऊन मांडले आहे.

::::

 हमीद दलवाई हे माझे फार घनिष्ठ मित्र होते. लेखक, कार्यकर्ता, पट्टीचा वक्ता, इतकेच नव्हे तर मित्र म्हणून ते फार मोठे होते. केवळ सत्तेचाळीस वर्षांच्या आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जे महान कार्य केले ते मुस्लिम समाज व एकूण भारतीय समाज यांच्या दृष्टीने चिरंतन मूल्य असलेले होते याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. कार्यकर्ता म्हणून त्यांचा कार्यकाल १९६० ते १९७७ असा केवळ सतरा वर्षांचा होता. या काळात 'मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया' आणि 'मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय' हे दोन ग्रंथ लिहून आणि भारतभर प्रबोधनावरील असंख्य व्याख्याने देऊन त्यांनी मुस्लिम समाजात एक नवीन प्रखर अशी लाटच निर्माण केली. १९७० मध्ये स्थापन केलेले 'मुस्लिम सत्यशोधक मंडळ' म्हणजे चौदाशे वर्षांच्या मुस्लिम इतिहासातील एक नवीन ऊर्जस्वल असा प्रारंभ मानावा लागेल. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्याची गंगोत्री गुरुवार पेठेतील माझ्या घरामध्ये प्रवाही बनली याचा मला मनापासून अभिमान आहे. १९६६ साली तलाकपीडित अशा सात स्त्रियांचा मोर्चा, सनातन्यांच्या धमकावण्यांना भीक न घालता, मुंबई येथे त्यांनी काढला आणि अखेरीस, अहले हदीसपासून अनेक संघटनांना जबानी तलाकच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली ही गोष्ट असामान्यच मानावी लागेल. काहीजण असा प्रश्न विचारतील की स्वत:ला ईहवादी, धर्मनिरपेक्षतावादी मानणाऱ्या व आपले अंत्यसंस्कार मुस्लिम रिवाजाप्रमाणे न करणाऱ्या हमीद दलवाई यांनी मुस्लिम समाजातच कार्य करण्याचे का ठरविले? जन्माने मुस्लिम असल्यामुळे हमीद दलवाई यांना स्वाभाविकपणे असे वाटले की भारतीय एकात्मतेचा प्रवाह दृढमूल करण्यासाठी मुस्लिम समाजात आधुनिक बदलाव अत्यावश्यक आहेत आणि म्हणूनच त्यांनी हा निर्णय बेडरपणे घेतला. हमीद दलवाई यांच्यावर जे अनेक आरोप करण्यात आले त्यांमध्ये ते हिंदुत्ववादी विचारांचे हस्तक होते असाही एक आरोप होता. परंतु हमीद दलवाई हे सर्व धर्मीयांतील कट्टर पंथीयांच्या विरोधात प्रखरपणे झुंज घेत असत. त्यामुळेच पुण्यातील टिळक स्मारक मंदिरातील त्यांच्या सभेत हिंदुत्ववाद्यांनी आरडाओरडा केला आणि अमरावती येथील त्यांची एक सभा दगड मारून हिंदुत्ववाद्यांनी बंद पाडली. मुस्लिम समाजातील ज्या मंडळींना हमीद दलवाई आपले विरोधक वाटत असत, त्यांनी निर्माण केलेला हा एक चुकीचा आरोप आहे. आता प्रसिद्ध होत असलेल्या पुस्तकातील

६/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान