पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/72

हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाही. या बाबतीत त्यांनी मुसलमानांना स्वातंत्र्याच्या मार्गात अडसर आणण्याचा व्हेटो दिला होता. मात्र पंजाब अखंड ठेवण्यासाठी शिखांना असा व्हेटो देण्यास ते तयार नव्हते. आपण जीनांशी जुळते घ्या असा अनाहूत सल्ला ते शिखांना देत होते. शीख या सापळ्यात अडकले नाहीत आणि त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेऊन पंजाबची फाळणी अटळ ठरविली. आता तेवीस वर्षांनंतर पाकिस्तानात सामील होण्याबाबतीतील शीखांची भीती बरोबर होती आणि त्यांनी अखेरीला भारतात सामील होण्याचा घेतलेला निर्णय योग्य होता असे म्हणावे लागते. कारण पाकिस्तान स्थापन होताच पाकिस्तानी पंजाबमधून महिन्याभरातच त्यांची हकालपट्टी झाली. सबंध पंजाब पाकिस्तानात गेल्यानंतर तर ते देशोधडीला लागले असते. पंजाबच्या फाळणीमुळे स्वत:ची भूमी तरी त्यांच्यापाशी राहिली.
 मजूर मंत्रिमंडळाने तीन-सदस्य शिष्टमंडळ भारतात पाठविताना प्रथमच ॲटलीनी अल्पसंख्यांकांना बहुसंख्यांकांच्या प्रगतीच्या मार्गात अडथळा आणण्याचा व्हेटो दिला जाणार नाही असे म्हटले, परंतु ब्रिटिश सरकार या भूमिकेला चिकटून राहिले असे नाही. तीन सदस्यांचे शिष्टमंडळ १९४६च्या मार्चमध्ये भारतात आले. शिष्टमंडळाने मुस्लिम लीग आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या पुढाऱ्यांबरोबर संयुक्त बैठक घेऊन दुबळे केंद्र सरकार असलेल्या भारतीय संघराज्याची योजना मांडली. देशाचे विभाजन टाळण्यासाठी ही योजना सुचविण्यात आली होती. या योजनेनुसार भारताचे तीन गट करण्यात आले होते. एका गटात पंजाब, सरहद्द प्रांत, सिंध आणि बलुचिस्तान ही मुस्लिम बहुसंख्यांक राज्ये एकत्र आणण्यात आली होती. या गटातील मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण सुमारे ८० टक्के होत होते. दुसरा गट आसाम आणि बंगाल या राज्यांचा बनविला होता, ज्यात जेमतेम ५० टक्केच मुस्लिम लोकसंख्येचे प्रमाण होते. तिसरा गट इतर सर्व राज्यांचा मिळून बनविलेला होता, ज्यातील हिंद लोकसंख्येचे प्रमाण ८५ टक्के होते. या तीन राज्यगटांचे मिळून भारतीय संघराज्य होणार होते आणि संघराज्याच्या सरकारला परराष्ट्र, दळणवळण आणि संरक्षण इतकेच अधिकार देण्यात आले होते. याखेरीज सर्व संस्थाने मिळून चौथा गट कल्पिण्यात आला होता. याखेरीज दहा वर्षांनंतर यातील कोणत्याही राज्याला फुटून निघण्याचा अधिकार बहाल करण्यात आला होता. हा अधिकार दहा वर्षांनी अखंडपणे बजावण्याची तरतूदही त्यात केली होती.

 वस्तुत: काँग्रेसने ही योजना का मंजूर केली ते कळत नाही. बहधा कोणतीही किंमत देऊन भारत एकत्र ठेवण्याच्या ईष्येने काँग्रेसचे नेते झपाटले होते असे दिसते. परंतु या योजनेने भारत एकत्र राहू शकणार नव्हता हे त्यांच्या लक्षात आधी आले नाही असे दिसते. ही योजना जीनांनी आणि लीगने आधी मान्य केली होती. जीनांनी ती मान्य करणे स्वाभाविक होते, कारण ताबडतोब सबंध भारतावर हुकूमत गाजविण्याची एक सुसंधी मुस्लिम समाजाला प्राप्त होत होती. इतकेच नव्हे तर दहा वर्षांनी अधिक मोठ्या आकाराच्या पाकिस्तानच्या निर्मितीची बीजेही तीत होती. वस्तुत: आसाममध्ये मुस्लिम अल्पसंख्यांक होते. परंतु जीनांच्या समाधानासाठी या योजनेत आसाम आणि बंगालला एका गटात एकत्र आणले गेले. ही योजना राबविली गेली नाही म्हणून पुढे फाळणी झाली आणि आताचे पाकिस्तान अस्तित्वात

पाकिस्तानची चळवळ/७१