पान:राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान.pdf/83

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तयार होते. ते चित्र निर्भेळ धर्मनिरपेक्षवाद्याचे आणि मानवी मूल्ये जोपासणाऱ्याचे निश्चितपणे नव्हे. हे चित्र धर्मवाद्याचेही नव्हे. कारण रूढ अर्थाने ते धर्मवादी नव्हते, त्यांच्या अनेकविध भूमिकांतून प्रकट होणारे हे चित्र धर्मसमुदायवाद्याचे आहे. पण धर्मसमुदायवाद्याला रूढ अर्थाने धर्म मानण्याची गरज असतेच असे नाही. त्यामुळेच जीना नमाज पढत नव्हते. पाश्चात्त्य वेष करीत होते, काट्या-चमच्याने जेवत होते, अनेक हिंदू त्यांचे मित्र होते आणि अखेरीला : पाकिस्तान हे धर्मनिरपेक्ष राज्य होईल असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे ते जातीयवादी नव्हते हे सांगण्याची फॅशनच आपल्याकडे अस्तित्वात आहे. जीनांनी पारशी स्त्रीशी लग्न केले यावरून जीना जातीयवादी नव्हते असा हास्यास्पद निर्वाळा जीनांची भलावण करणारे देतात. औरंगजेबानेदेखील अनेक हिंदू स्त्रियांशी लग्ने केली आणि काही देवळांना दाने दिली. त्यामुळे तोदेखील धर्मनिरपेक्ष होता असे म्हणायचे काय? पारशी स्त्रीशी लग्न करणाऱ्या जीनांनी आपल्या मुलीने पारशाशी लग्न केले म्हणून मरेपर्यंत तिचे तोंडदेखील पाहिले नाही. (पारशीं पत्नीपासून झालेल्या जीनांच्या मुलीने नेव्हल वाडिया या ख्रिश्चन झालेल्या पारशी सद्गृहस्थाशी विवाह केला. 'मी धर्म सोडला हा माझ्या पित्याचा माझ्यावर रोष होता,' असे तिने म्हटले आहे. पहा - Radiance.) ही गोष्ट जीनांच्या धर्मनिरपेक्षतेचा डांगोरा पिटणाऱ्या त्यांच्या स्तुतिपाठकांनी नेहमी लपवून ठेवली आहे. (गांधीजीदेखील आंतरधर्मीय लग्नांना विरोध करीत, असे यावर कोणी म्हणेल. परंतु आपण परधर्मीय स्त्रीशी लग्न करायचे आणि आपल्या मुलीला परधर्मीयाशी लग्न करायला विरोध करायचा असला दुटप्पीपणा गांधींनी केलेला नाही. ते सनातनी होते, परंतु त्यांचा सनातनीपणा समान मानवी मूल्ये जोपासण्याच्या आड त्यांनी येऊ दिलेला नाही. आपल्या धर्मनिष्ठा मानवी मूल्यांशी जुळत्या घेण्याची अजब आणि आश्चर्यकारक पात्रता त्यांच्या ठायी होती. त्यांच्यामध्ये हळूहळू बदल होत गेला आहे. सनातनत्व गळून पडले आहे. आणि उच्च मानवी आदीकडे त्यांनी वाटचाल केली आहे. गांधीजींच्या या बदलाच्या पार्श्वभूमीवर जीनांच्या (आणि सावरकरांच्याही) जीवनात झालेला बदल तुलनेने पारखता येईल. आरंभी धर्मनिरपेक्ष भूमिका घेणारे हे दोघे नंतर धर्मसमुदायवादी भूमिका घेऊ लागले. आरंभी सनातनी भूमिका घेणारे गांधीजी नंतर आदर्श मानवतावादी भूमिकेला पोहोचले. नेहरूंच्या कन्येचे, इंदिरेचे फिरोज गांधी या पारशी तरुणाशी १९४० साली लग्न ठरले तेव्हा गांधीजींनी पत्रक काढून आपला पाठिंबा व्यक्त केला, हे गांधीजींच्या बदलत्या व्यापक दृष्टीचे द्योतक आहे.) याचा अर्थ असा की धर्माच्या जपणुकीची जीनांची कल्पना धर्मसमुदायाचे हितसंबंध सांभाळण्याची होती. जीना धर्मशास्त्राचा विचार करीत नव्हते. मुस्लिम धर्मसमुदायाच्या हिताचा विचार करीत होते. हा समुदाय सत्तेत अर्धा वाटा मिळत असेल तर अखंड भारतात आपले हितसंबंध सुरक्षित राखू शकेल असे त्यांना वाटत होते. आपल्या धर्मसमुदायाचे हितसंबंध सुरक्षित ठेवणे जातीयवादी कसे? असे कोणी म्हणेल. पंचवीस टक्के मुस्लिम समाजाला पंचवीस टक्के अधिकार जीनांनी मागितले असते तर त्यांना जातीयवादी लेखता आले नसते. दुसऱ्याचे हितसंबंध न दुखावता आपल्या हितसंबंधांचे रक्षण करणारा जातीयवाद निरुपद्रवी असतो. जीनांच्या जातीयवादाच्या बाबतीत तसे म्हणता यावयाचे नाही. त्यांना पंचवीस टक्क्यांकरिता पन्नास टक्के अधिकार हवे होते. थोडक्यात

८२/राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान