पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१३५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 असे आठवणारे अनेक वसंत. पण गेल्या २५/३० वर्षांत हे सुरंगी.. सुगंधी वसंत जणू आयुष्यातून हरवले आहेत. मार्च महिना बसंती रंगाचा. मार्च आला की गेल्या तीस वर्षांपासून आठवतो '०८ मार्च, महिला दिवस.' महिलांनी आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक क्षेत्रातील दुय्यम स्थानाला आव्हान देऊन 'बाई' म्हणून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरूद्ध संघटितपणे लढा द्यायला सुरवात केली त्याची 'नांदी' ठरणारा दिवस. अमेरिकेतील, युरोपातील कष्टकरी स्त्रियांनी बाई म्हणून अधिक तास श्रम, पण वेतन मात्र कमी; या वास्तवाला संघटितपणे टक्कर दिली.
 ०८ मार्च १८५७ रोज न्यूयॉर्कच्या कापड गिरण्यांत काम करणाऱ्या महिलांनी गिरणी मालकांकडून होणारी पिळवणुक, श्रम जास्त पण मोबदला कमी या विरुद्ध निदर्शने केली. पोलिसांच्या हल्ल्याला तोंड दिले. नंतर दोन वर्षांनी मार्च मध्ये महिला कामगारांची संघटना बांधली. १९०८ साली पंधरा हजार महिलांनी कामाच्या तासात कपात व्हावी म्हणून मोर्चा काढला.
 १९०८ पासून ०८ मार्च हा दिवस 'महिला दिन' म्हणून पाळला जाऊ लागला. जगातील स्त्रियांच्या समाजातील स्थानाचा, त्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करणारे व्यासपीठ निर्माण झाले. १९९० साली पहिली आंतरराष्ट्रीय महिला परिषद कोपन हेगेन येथे पार पडली. गेल्या काही वर्षांपासून भारतातही हा दिवस विविध सामाजिक संस्था, संघटना, स्त्रीच्या समाजातील स्थानाचा गांर्भियाने विचार करण्याचा विशेष दिवस म्हणून पाळतात. स्त्रियांच्यात, एकूण समाजात जाणीव जागृती व्हावी यासाठी योजनांची कार्यक्रमांची आखणी करतात. परंतु अलिकडे हा दिवस खेड्यांपासून ते थेट तालुका जिल्हा - राज्य स्तरावर, शाळा... महाविद्यालये... संस्था आणि शासन यांच्या द्वारे 'साजरा' केला जातो. त्यामागे 'एक विधी पार पाडला' अशी उपरी भावना असण्याचीही शक्यता असते. ही तांत्रिकता येऊ नये याची खबरदारी मात्र जाणीवपूर्वक आपण सर्वांनी घ्यायला हवी.
 गेल्या काही वर्षात महिला सबलीकरणाचा नारा सर्वत्र दिला जातो. या दिवसाच्या निमित्ताने का होईना, समाजातील 'बाई' च्या दर्जाचा विचार वास्तवाचे भान ठेवून आपण शोधतो. का? या 'आपण' मध्ये सुजाण, शिक्षित, राजकीय-आर्थिक- सामाजिक क्षेत्रात काम करणारे स्त्री पुरूष आले. स्त्रीचे सबलीकरण हे समाजाच्या सबलीकरणाचा एक भाग आहे. गेल्या दोन हजार वर्षे बाईचा सामाजिक दर्जा तळातला होता. याला जबाबदार सामाजिक... धार्मिक परंपरा, जगण्याचे रीतीरिवाज आहेत. ते कोण्या एका व्यक्तीने वा धर्माने लादलेले नाहीत. समूहाच्या जगण्याच्या चालीरितीतून ते

रुणझुणत्या पाखरा / १२१