पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२८

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "..म्हणून तर! मॅडम २१ व्या शतकातही जाती बाहेरच्या मुलावर प्रेम केलं म्हणून मुलगी मारली जाते.. एखादी मुलगी आपल्याशी लग्न करायला नकार देते म्हणून तिच्या अंगावर ॲसिड फेकून तिला विद्रुप केले जाते..
 "हो आमच्या गावातल्या जेमतेम चौदा वर्षाच्या मुलीचे लग्न करून दिले. बिचारी आठवीत होती. हुशार होती. लग्न लवकर का? तर मुलगा मुंबईत नोकरीला आहे, कुठल्याशा कंपनीत. नि त्याला महिना पाच हजार रुपये पगार आहे.. पण मॅडम दीडवर्षात तो एडस् ने मेला नि ती मुलगी आली माघारी, आता तर फार वाईट अवस्था आहे तिची. तिला घरात घेत नाहीत. शिळे तुकडे खायला देतात. एडस् बद्दल धड माहिती कोणालाच नाही मग यात त्या मुलीचा काय दोष?" तिसरीचा प्रश्न. लगेच चवथीने खंत बोलून दाखवली.
 "दीडशे वर्षांपूर्वी ज्योतिबांनी आपल्या आईवडिलांना स्पष्टपणे सांगितले होते की मूल न होणे हा केवळ पत्नीचा दोष नसतो. पुरूषातही दोष असू शकतो. सावित्रीत जर दोष आढळला तर मी जरूर दुसरा विवाह करीन पण माझ्यात दोष आढळला तर सावित्रीचा दुसरा विवाह करून देण्याचे वचन..आश्वासन मला द्याल? खरंच! हे जेव्हा वाचतो, ऐकतो तेव्हा वाटतं ज्योतीराव आणि सावित्रीबाई एकविसाव्या नव्हे तर एकतिसाव्या शतकात जगत होते..." "हो ना. आणि आपण? आपले विचार, आपली जगण्याची रित.. सगळेच सतराव्या शतकातले. आपल्या मेंदूचे कंडिशनिंग कोणी केलेय? धर्मानी की जातीपातीच्या जख्खड परंपरांनी?" आणखी एकीची खंत.
 ...गेल्यावर्षीची ही हकीकत. तीन जानेवारी हा क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा जन्मदिवस. त्या निमित्ताने पथनाट्य बसवले जात होते. गाव तसे तालुक्याचेच. पण आडवळणाचे. जीवनविषयक तंत्रशिक्षण देणारे मुलींचे गृहविज्ञान महाविद्यालय, जेमतेम शंभर मुलींचे. त्यावेळची ही चर्चा.
 ते संवाद ऐकून मीच नाही तर नोकरी आणि भाकरीच्या निमित्ताने एकत्र येणाऱ्या आम्ही पाच सहा जणी खूप अंतर्मुख आणि अस्वस्थ झालो.
 आणि माझ्या मनात दहा बारावर्षापूर्वीचा तो प्रसंग जागा झाला. ते सुशिक्षित मध्यमवर्गीय घर. गृहस्थ वकील. सुसंस्कृत. प्रगत आणि प्रगल्भ विचारांचे. अचानक पोटाचा विकार जडला. मग डॉक्टर्स.. तपासण्या वगैरे. तो आजार जीव घेणाऱ्या कॅन्सरचा ठरला. सद्गृहस्थांनी हे सत्य पचवले. त्यांची आज सुविद्य असणारी पत्नी विवाहाचे वेळी जेमतेम आठवी-नववी उत्तीर्ण होती. परंतु पतीच्या प्रोत्साहनाने त्या पदवीधर झाल्या. मुले शिकली. जणू पाचही बोटे तुपात. त्यात हे नवे संकट. पण

१४ / रुणझुणत्या पाखरा