या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(पडदा उघडतो तेव्हा रंगमंचावर उच्चमध्यमवर्गीय थाटाचे घर दिसते. उत्तम सजावट केलेली. फर्निचर उंची आणि नजरेत भरणारे. मंचाच्या उजव्या कोपऱ्यात एक बिछाना, समोर पडदा वगैरे... थोडक्यात तिथं एखाद्या व्यक्तीचं स्वतंत्र राहणीमान असावं असं नेपथ्य. बापू साधारण पन्नाशी ओलांडलेला आणि लता त्याची बायको पन्नाशीच्या घरातली. दोघेही उत्साहानं तयारी करतायत. गौरीपूजनाचा दिवस आहे. दोघांची धांदल सुरू आहे.)

बापू  : अगं, ते तोरण नीट बांधलंस का दारावर ?
लता  : (ती कामात मग्न ) सोफ्यावर ठेवलंय, तेवढं लावा प्लीज !
बापू  : काय हे, गौरी पूजना दिवशी सकाळीच तोरण लावायला हवं.
लता  : सकाळीच काढून ठेवलंय, पण तू श्वास घेऊ देशील तर ना ?
बापू  : मी ? मी काय केलं ? (तोरण घेऊन लावायला लागतो) पंचवीस
 वर्ष झाली असतील ना या तोरणाला ?
लता  : जास्तच. विणलेलं ते तोरण दारावर लागायची ही फक्त
 २५, २६ वी वेळ असेल.
बापू  : असं कसं ?
लता  : फक्त गौरीपूजनाच्या दिवशीच तर लावतो ना आपण.
बापू  : (घडयाळ पाहत) रूपा नाही गं आली अजून !
लता  : येईल. गौरी आगमनापर्यंत येते म्हणालीय.
बापू  : आज तिनं सुटी घ्यायला हवी होती.
लता  : कसं शक्य आहे ? बीपीओमध्ये आहे म्हटलं ती. कधी कॉल
 येईल सांगता येत नाही.
बापू  : मला का माहिती नाही ते ? पण आज सणाचा दिवस त्यातून ती
 मुलगी. मग तिला सुटी द्यायला पाहिजे कंपनीनं.
लता  : गेला तो जमाना. आता सगळे सण उत्सव कंपनीतच साजरे होतात.
बापू  : ते ही बाकी खरंच म्हणा. रूपानं यंदा वाढदिवसही चक्क कंपनीतच
 साजरा केला.
लता  : (गौरीच्या मुखवटयाचं तबक घेऊन त्यात तांदूळ वगैरे पसरत)
 हे एक बाकी बरंय म्हणायचं. सगळे एकमेकांना सांभाळून घेतात.
 वाढदिवस साजरे करतात, एकमेकांची सोबत करतात.

रुपक । १५ ।