या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



बापू  : (तिला तबकात वस्त्र घालून देत) मुलं-मुली असा भेद नाहीच
 राहिला हल्ली. कंपनीही तो करत नाही आणि कर्मचारीही !
लता  : बाकी बापू, 'व्हीआरएस' घेतल्यापासून तू अगदी पोक्त
 म्हाताऱ्यासारखा बोलायला लागलास. कॉलसेंटरमध्ये किंवा
 कुठल्याच कंपनीमध्ये जेंडरचा विचार नाही केला जात.
बापू  : (म्हातारा शब्द त्याला लागलाय ) लता, मी अगदीच काही म्हातारा
 झालेला नाहीये. तुला बघायचंय का--
लता  : हं, गौरीपूजनाची तयारी कर. म्हणे बघायचंय का ? ही रूपा की येते
 कुणास ठाऊक?
बापू  : मी फोन लावतो तिला. (तो मोबाईल लावतो. रिंग वाजते
 बराचवेळ ती उचलत नाही. तो अस्वस्थ )
लता  : काय झालं ?
बापू  : अग नाही उचलत ती.
लता  : कामात असेल.
बापू  : (ओरडत) कामात असेल तर ती आता येईल कशी ?
लता  : शांतपणे काम संपवण्याची घाई करत असेल. म्हणूनच फोन नाही घेत ती.
बापू  : (तो अस्वस्थ ) तुला सांगितलंय का तिनं तसं ?
लता  : सांगायला कशाला पाहिजे ? कळतं ना. ती बिझी आहे म्हणून
 फोन नाही उचलत. मी नव्हते का करत तसं ?
बापू  : तू ? लता, तुझी कंपनी ती केवढी, तुझी धावपळ ती काय, उगाच
 रूपाशी नको तुलना करू स्वत: ची.
लता  : (मिश्किलपणे) का ? रूपाची कंपनी मोठी म्हणून तिची पत जास्त
 आणि माझी छोटी-
बापू  : काही तरी बोलू नकोस. माझा कंट्रोल सुटतोय.....
लता  : काय कारण आहे कंट्रोल सुटायचं ? ती येईलच आत्ता.
बापू  : असं काही तरी सांग ना. आजचं गौरीपूजन तिच्याकडून करून
 घ्यायचं ठरवलंय मी.
लता  : किती वेळा सांगणारैस तेच. माझी तयारी झालीय.
बापू  : मुखवटे कुठं आहेत ?

रुपक । १६ ।