या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ६१ ]

 गेल्या पाच वर्षांत चांदीचा भाव जास्त झाल्यामुळे जी आपत्ति आली, तिचा विचार केला असतांही, नोटांचे चलन वाढविणे जास्त श्रेयस्कर आहे. रुपये पाडण्यास कोणत्याही कारणाने विघ्न आले तर नोटांवर व्यवहार चालू शकता; परंतु असे होण्यास लोकांमध्ये कागदी चलन वापरण्याची पद्धति पूर्ण रूढ पाहिजे. नोटांचे चलन वाढल्यास आणखी एक फायदा होईल, हल्ली असे दिसून येते की, रुपयांच्या चलनांत अतिशय अस्थिरता आहे ; म्हणजे एका वेळीं कोट्यवधि रुपये चलनांतून कमी होतात व दुसऱ्या वेळीं कोट्यवधि रुपये चलनांत येतात. नोटा चलनांत आल्यास, नोटा देऊन रुपये घेणे व रूपये देऊन नोटा घेणे हा व्यवहार कमी होईल व त्यापासून एकंदर चलन जास्त स्थिर होईल.

 येथील नोटांच्या चलनाचा एक मोठा दोष असा होता की, एखादी मध्यवर्ति स्टेट बँक नसल्यामुळे, बँकिंगचें मामुली काम करण्यास सरकारजवळ कांहीं साधन नव्हते. ट्रेझरीज्' आहेत त्यांचे, पैसे रक्षण करण्याशिवाय दुसरें कांहीं काम नाहीं. फार झाले तर नोटांचे रुपये देणे व रुपयांच्या नोटा देणे हे काम त्या करितात; परंतु व्यापाराच्या तेजीच्या वेळी ज्याप्रमाणे जर्मनींतील रीशबँक' जास्त नोटा काढू शकते, त्याप्रमाणे येथे सरकारला देखील करता येत नाही, आतां ‘इंपीरियल बँक' निघाल्यामुळे हा दोष नाहीसा होईल अशी आशा करण्यास जागा आहे.