पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/२१

हे पान प्रमाणित केलेले आहे.

आधारे विवेकानंद जयंतीला देशी-विदेशी खेळांची क्रीडाप्रात्यक्षिके योजली जातात. निगडीच्या विस्तीर्ण क्रीडांगणावर गेली बारा वर्षे उपनगर पातळीवरचा ‘क्रीडामहोत्सव' भरतो.अशा क्रीडास्पर्धाना साहस-सहलींची जोड असते . सह्याद्रीच्या कडेकपारीत इतिहासाचा मागोवा घेत विद्यार्थी हिंडतात.
 सूर्यनमस्कार, योगासने, पोहणे या व्यक्तिगत व्यायामाचेही महत्त्व मोठे आहे. इयत्ता आठवीमध्ये उपनयन म्हणजे विद्याव्रताचा संस्कार योजलेला असतो. तत्पूर्वीच्या व्याख्यानमालेची सुरुवात ‘शरीर सतेज सुंदर' या विषयाने होते. युवक व युवतींसाठी दोन स्वतंत्र व्याख्यानमाला होतात. ब्रह्मचर्याश्रमाचे महत्त्व आणि यमनियम, त्यातील शरीरविज्ञान आणि घ्यावयाची काळजी यांबद्दल त्यात मार्गदर्शन केले जाते. यथाकाल गृहस्थाश्रमात प्रवेश करेपर्यंत आरोग्यपूर्ण, तेजस्वी शरीराची जोपासना कशी करायची, याचे विवेचन व चर्चा होते. आरोग्याचे काही मूलभूत शिक्षण या काळात दिले जाते. तसेच आयुर्वेदातील सोप्या, घरगुती औषधांचा परिचयही विद्याथ्र्यांना या काळात करून दिला जातो. जून १९९८ पासून क्रीडा- कुलाचा अभिनव प्रयोग निगडी येथे सुरू झाला आहे. त्यामध्ये शारीरिक शिक्षण केंद्रबिंदू मानून सगळ्या शिक्षणाची मांडणी करणे चालू आहे.
मन सुदृढ नि पवित्र
 उत्तम शरीराला ‘मन सुदृढ पवित्र.....' याची जोड हवी. मन:स्वास्थ्यासाठी मनाची कार्यपद्धती विद्यार्थ्यांना समजावून सांगितली जाते. आवश्यक तेथे व्यक्तिगत मार्गदर्शन(कौन्सेलिंग) करण्याची सोय आहे. त्यासाठी मानसशास्त्र संशोधिकेतील तज्ज्ञ उपलब्ध असतातच, परंतु प्रामुख्याने शाळेतील अध्यापकांनी ही जबाबदारी सांभाळावी अशी कल्पना आहे. जिव्हाळ्याचे शिक्षक-विद्यार्थी संबंध हा येथील शिक्षणाचा पाया मानला आहे.
 अभिव्यक्तीसाठी उत्तेजन आहे. संगीत व चित्रकला यांच्या तासिका असतात. संमेलनातून नाट्यगुण व्यक्त होतात. समज जसजशी वाढू लागते तसतशी ही कला देशकार्याच्या प्रेरणेशी कशी जोडायची, याचे दिग्दर्शन केले जाते. उत्तमोत्तम चाली लावलेली आशयघन पद्ये, व्यक्तिगत वा सामूहिक, प्रसंगानुरूप साभिनय अशी म्हटली जातात. ती मोठी स्फूर्तिप्रद असतात. त्यातून एकदिशेने वाटचाल चालू असल्याचा प्रत्ययही येतो. कथाकथने, चरित्रे, गोष्टी यांची निवड या विशिष्ट दृष्टिकोनातून केलेली असते. मनोरंजनातून आवाहनाची गुंफण असते. हसतमुख, आनंदी, मोकळ्या स्वभावाची जडणघडण या प्रक्रियेतून होते. त्याबरोबरीनेच चौरस माहिती, जबाबदारीची जाणीव आणि विचारांची पक्वता वाढत जाते.



रूप पालटू शिक्षणाचे(१५)