या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मरूं लागल्यामुळे व्यापारी लोक अगदी घाबरून गेले व रेशमाचा व्यापार अगदी बसून जातो की काय अशी त्यांस भीती पडली, त्यावेळी तिकडील सर्व लोकांनी मिळून सरकारास विनंति केली की, या प्रसंगी कोणातरी तज्ज्ञ शोधकाची या कामी योजना व्हावी. सरकारने ही गोष्ट लक्ष्यांत आणून पाश्चूरला त्या कामावर नेमिलें. पाश्चूर हा तिकडे गेल्यावर त्याने पुष्कळ माहिती मिळविली. सूक्ष्मदर्शकयंत्राच्या साहाय्याने किड्यांवर निर. निराळे प्रयोग करून पाहिले व शेवटी असें ठरविले की, त्या किड्यांमध्ये एकप्रकारचे सूक्ष्म जंतू असून त्यामुळे ते मरतात. ही गोष्ट त्यास समजताच त्याने रोगजंतूंचा नाश करण्याचे उपाय योजिले व त्यापासून पुढे रेशमाच्या किड्यांचा संहार होण्याचे बंद पडले. अशा प्रकारचा महान् व अद्वितीय शोध पाश्चूरनें लाविल्याचे समजतांच दुसऱ्या शोधकांचे त्याकडे लक्ष गेलें व त्यांनीही त्यानंतर निरनिराळ्या रोगांचे जंतू शोधण्याचे प्रयत्न चालविले व आज आपल्याला जे जे ह्मणून निरनिराळ्या रोगांचे जंतू दिसतात ते सर्व प्रयत्न निरनिराळ्या शोधकांचे होत. एकंदरीत आरंभी ज्याने हा शोध लाविला व त्यामुळे इतर शोधकांचे लक्ष्य त्याकडे गेले त्या महात्म्याचे (पाश्चूरचे ) सर्व जगावर अत्यंत उपकार आहेत यांत संशय नाही. पाश्चूरनें पिसाळलेल्या कुत्र्याच्या विषावर औषध शोधून काढले असून तें त्याचेच नांवाने प्रसिद्ध आहे. पाश्चूरनें कांही मोठमोठ्या परीक्षा दिलेल्या नव्हत्या. पण त्याला विद्याव्यासंग फार होता. ही गोष्ट प्रत्येकानें लक्ष्यात ठेवण्यासारखी आहे.