या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ते चांगले ओळखतां येत नाहीत. कारण निरनिराळ्या जंतूंत फारच थोडा फरक असल्यामुळे ते परस्परांपासून ओळखणे कठीण पडते. यासाठी त्यांची भिन्नता निरनिराळ्या रंगांच्या साहाय्याने ओळखावी लागते. (३) प्राण्यांच्या शरीरांत जंतूंचा कृत्रिम प्रवेश करवून कृत्रिम रोगोत्पत्ति करणे. या योगानें कोणता जंतु कोणता रोग उत्पन्न करितो हे समजते. हे प्रयोग विशेषेकरून जनावरांवर करतात. कारण हे शास्त्र अगदी आधुनिक असल्यामुळे ते अद्यापि अपरिपक्क स्थितीत आहे आणि अशा स्थितींत वरील प्रकारचे प्रयोग मनुष्यांवर करणे केवळ धोक्याचें आहे, हे उघड आहे. जनावरांवरील प्रयोगांसंबंधी पूर्णपणे खात्री पटल्यावरच तसले प्रयोग मनुष्यांवर करणे रास्त होईल. डॉ. कॉक यांनी पुष्कळ शोधांअंती जंतुशास्त्रासंबंधानें कांहीं ठळक तत्त्वे शोधून काढली आहेत, ती पुढीलप्रमाणे:--(१) जंतूंमुळे उत्पन्न होणारा रोग एखाद्यास झाल्यास त्या रोगाचे जंतू त्याच्या रक्तांत अगर शरीरांतील इतर घटकावयवांत सांपडले पाहिजेत. (२) जंतूंची उत्पत्ति शरीराच्या बाहेर वंशपरंपरा चालली असली पाहिजे. (३) विशिष्ट प्रकारच्या जंतूंच्या योगानें विशिष्टप्रकारचे रोग विवक्षित प्राण्यांत झाले पाहिजेत. कारण एकाच प्रकारचे जंतू सर्व प्राण्यांवर आपला अंमल सारखा चालवू शकत नाहीत. (४) प्राण्यांच्या शरीरांत जंतू घातल्यावर जो रोग उत्पन्न झाला असेल त्या रोगाचे जंतू त्या प्राण्यांच्या रक्तांत अगर इतर अवयवांत सांपडले पाहिजेत.