या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

श्वेतकण हे आपल्या अंगांत जंतू शोषून घेतात व त्याचे पाचन करून नाश करितात. सूक्ष्मदर्शकयंत्राने पाहिल्यास हे मेकनीकॉफू साहेबांचे मत खरे दिसते. ह्याशिवाय आपल्या रक्तांत एखादे विष गेले असतां त्यास उपरोधक (To neutralise) असें प्रतिविष तयार होत असते. असो. एकंदरीत आपल्या अंगांत रोगजंतूंचा नाश करण्याची एक प्रकारची शक्ति आहे, यांत संशय नाही. जंतूंमूळे रोगोत्पत्ति केव्हां होते ? शरीर अशक्त झालेले आहे अशा वेळी जर एखादा रोगजंतु शरीरांत शिरला तर तो वाढून त्यापासून रोगोत्पत्ति होऊ शकते. ज्याप्रमाणे धान्य चांगले उत्पन्न व्हायाला अगोदर शेताची नांगरणी, खत, वगैरे कमाविशी करावी लागते त्याचप्रमाणे शरीरांत जंतूंचा प्रवेश होऊन रोगोत्पत्ति व्हायाला शरीरप्रकृति क्षीण व्हावी लागते. ही क्षीणता पुष्कळ प्रकारांनी येत असते. थंड हवा, ओलांत फिरणे, सूर्यप्रकाशाचा अभाव, अशुद्ध हवा, अयोग्य आहार व विहार, पचनक्रिया बरोबर नसणे, मद्यपान, ब्रह्मचर्य न पाळणे, निरनिराळ्या प्रकारच्या चिंता, वगैरे पुष्कळ कारणांनी शरीर क्षीण होते. ज्या मानाने शरीर क्षीण झालेले असेल त्या मानाने एखादा रोग जडण्याचा जास्त संभव असतो. ज्यावेळी एखादा मनुष्य त्याच्या बाहेरील रागरंगावरून आपणाला श्रीमंत वाटतो परंतु तो जेव्हां दिवाळे काढितो किंवा मृत होतो त्यावेळी त्याची खरी अंतःस्थिती किती शोचनीय होती हे जसे आपल्याला मागाहून कळून येतें म्हणजे बाह्य दिखाऊपणावरून आपण त्याचे