या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करीत असतां एक किंवा अनेक रूपें धारण करावी लागतात व ह्मणूनच त्यांनां निरनिराळ्या प्राण्यांचे पोटी जन्म घ्यावा लागतो. कोंबडी अंडी घालिते व त्यांस ती विशिष्ट वेळपर्यंत उबविते तेव्हां त्यांतून पिलें निघतात. रेशमाच्या किड्याला कोशावस्थेत राहिल्यानंतर आपली पूर्णावस्था प्राप्त होते. कुंभारीण माशीच्या अंड्यामधून जो किडा निघतो त्यास ती मातीच्या घरांत कांहीं दिवस कोंडून ठेवते तेव्हां त्यापासून त्याला पूर्णावस्था प्राप्त होऊन त्याची कुंभारीण माशी होते. तसेंच रोगांची उदाहरणे घेतली तर हायडाटीड, टेपवर्म व ट्रिकाईना ह्या जंतूंना अनुक्रमें कुत्रा, डुकर, बकरें यांच्या शरीरांत जाऊन आल्यानंतर ते माणसाच्या शरीरांत रोग उत्पन्न करण्यास लायक होतात. अशाच रीतीनें हिंवतापाच्या जंतूंना आपली पूर्णावस्था प्राप्त करून घेण्यासाठी काही मुदत चिलटाच्या पोटांत रहावे लागते. येथे या जंतूंसंबंधानें एक मजेदार गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे ती ही की, जेव्हां असें 'हिंवज्वरजंतुयुक्त चिलट सजीव प्राण्याखेरीज एखाद्या निर्जीव पदार्थावर बसते व आपली शुडिका त्यांत रोवण्यास लागते त्या वेळी त्याच्या लाळेंत असलेले हे जंतू बाहेर येत नाहीत. पण ती जेव्हां तें सजीव प्राण्यावर रोवतें त्या वेळी हे जंतू लगेच बाहेर येतात ! अर्थात् या जंतूंस सजीव-निर्जीव वस्तू जाणण्याचे ज्ञान असते असें ह्मणावे लागते. हे जंतू आरंभी कसे निर्माण झाले याचा अद्याप नीटसा शोध लागलेला नाही.