हे पान प्रमाणित केलेले आहे.



४९


 जीवक नांवाचा प्रसिद्ध शस्त्रवैद्य बुद्धधर्मीय होता. तसेच अष्टांग हृदयाचा कर्ता वाग्भट हाही बुद्धधर्मीयच होता असे वाटते, कारण अष्टांग-हृदयांत अगदी पहिल्या अध्यायांतच 'अनुयायात् प्रातिपदं सर्व धर्मेषु मध्यमाम् ' असे त्याने सांगितलेले आहे.

रावणाची राजधानी


 सीलोन मधून आम्ही परत आल्यावर रावणाची राजधानी कोटें होती, तिचे अवशेष कांहीं आहेत की नाहींत असा प्रश्न अनेक लोकांनी केला. आमच्या एका विद्वान् मित्राने तर एके दिवशी माझ्याशी बराच वादविवाद केला म्हणून या विषयाबद्दलची माझी मते सविस्तर एथे मांडीत आहे.

 रामायणाचा काल विद्वानांच्या-मते खि. पूर्व ३ रे शतक हा होय. वाल्मिकीनें रामायण रचल्यावर त्या काव्याला राष्ट्रीय ग्रंथ ही योग्यता येण्यास निदान एक शतकाचा तरी काल लागला असावा. रामायण हा ग्रंथ तयार झाल्यावर त्यांतील कथा व विभूतिपूजा सीलोन मध्ये जाऊन पोहोचण्याची क्रिया हिंदुधर्माच्या उपाध्यायांमार्फत किंवा क्षत्रियांच्या मार्फतच होणे शक्य होते. अन्य-धर्मीय लोक रामाचे यश, लक्ष्मणाची त्यागवृत्ति, सीतेचे पातिव्रत्य व हनुमानाची स्वामिनिष्ठा यांची स्तुति करतील ही गोष्टच अशक्य अशी आहे.

 डॉ. गैजर यांच्यामतें सिंहली भाषा ही आर्य भाषा आहे. डॉ. गैजर यांचा सिद्धान्त मान्य केल्यास आर्याची सीलोनमध्ये वस्ति केव्हा झाली हा दुसरा प्रश्न येतो. ज्ञानकोशकार डॉ. फेतकर यांचे मत असे आहे की, श्रौतधर्माचा विकास होण्याच्या अगोदर आणि ब्राह्मणजातीचा विकास होण्याचे अगोदर आर्यांची सीलोनमध्यें वास्त झाली होती. डॉ. केतकरांचे मत बरोबर आहे असे वाटते.