या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मीटर रनिंग कॉम्पिटिशन.”
 दुस-या दिवशी पायात ‘सिव्हिअर कॅम्पस्’ असल्यामुळे मीना शर्यतीत भाग घेणार नाही असं भारतीय संघानं जाहीर केलं. त्या शर्यतीत सानिया उतरली, पण तिला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. जिला सुवर्ण पदक मिळालं, तिच्यापेक्षा तीन सेकंद कमी वेळ घेत सेऊलला मीनानं १५०० मीटरची स्पर्धा जिंकली होती. आपल्या रुममध्ये आपला स्त्रीत्वाच्या झालेल्या घोर अपमानाच्या जाणिवेत सारा दिवस काळोख करून मीना अक्षरश: ओक्साबोक्शी रडत होती. त्यात पुन्हा आपल्याला खात्रीनं मिळणारं सुवर्ण पदक कट करून, न मिळू देण्याचं कारस्थान आपलेच सहकारी करतात, या जाणिवेनं ती हतबुद्ध झाली होती, त्या दुहेरी आघातानं ती कोसळली होती. त्याची परिणिती अविरत झरणाच्या अश्रूत होत हेती. तिचे तीव्र हुँतके व मुक्त वाहणारे आसू त्या रूमचे चारही कोपरे व भिंती निर्विकारपणे पाहत होत्या.
 त्यावर पुन्हा सानियानं जखमेवर मीठ चोळावं तसं कुत्सित स्वरात फोनवर विचारलं, “कशी आहेस मर्दसिंग...? आय मीना, मीना? सॉरी हं."
 मीनानं धाडकन रिसिव्हर फोनवर आपटला. पुन्हा मोठ्यानं आकांत करीत टाहो फोडला आणि उशीत तोंड खुपसून विकलपणे बेभान रडू लागली... किती तरी वेळानं ग्लानीची गुंगी चढली. तसे हुंदके थांबले व गालांवरून वाहणारे आसू पण सुकले, पण तिच्या सावळ्या चेह-यावरच्या शुभ्र दंतपक्ती दाखवणारं तिचं निर्मल हास्य मात्र त्या क्षणापासून कायमचं पुसून गेलं.
 “हे बेबी, तू फिमेल नाहीस, मेल आहेस. हा लिंगनिदान चाचणीचा निष्कर्ष खोल मनात पुन्हा पुन्हा डोकावत स्वत:ला तपासूनही पटत नव्हता. “मी - मी अंतर्बाह्य स्त्री आहे. क्रोमोझोमचं माहीत नाही, पण किशोरच्या पुरुषी आसक्त नजरेनं आपलं स्त्रीत्व मोहरून आलं होतं. त्याच्या बलदंड मिठीत चुरगळून जात शरीरसुख घेताना तनमनाचा कणकण फुलून आला होता. ही, ही माझ्या जातिवंत स्त्रीत्वाची खूण नाही का?"
 पण मेडिकल टेस्ट खोटी कशी म्हणायची? ते डॉक्टर्स काही माझे दुश्मन नाहीत. मन स्त्रीचं. शरीरही स्त्रीचं. फक्त छाती इतर बायकांप्रमाणे भरदार नाही. पण खेडेगावात अन्नान्न दशा असणा-या अनेक स्त्रिया सपाट छातीच्या असतात की! मग मी पुरुष कशी ठरते?

 आणि उद्या हे जेव्हा जगजाहीर होईल, तेव्हा सारी दुनिया मला त्या शिवा पारध्याप्रमाणे ‘मर्दसिंग' म्हणून उपहासानं म्हणेल. तो शब्द शापमुद्रेप्रमाणे मनमानसावर आपली तप्त निशाणी पुन्हा पुन्हा कोरत जाईल. आपली जखम अधिक तप्त व उग्र होईल. सारं जग मला स्त्री मानण्यास इन्कार करेल आणि दुसरी बाब म्हणजे आता आपले खेळाचे करिअर संपणार. मला कधीच पी. टी. उषाच्या पुढे जाता येणार नाही.

लक्षदीप ॥ १०५