या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मधाळ स्वरातलं 'सर' हे त्याच्यासाठी खास असलेले संबोधन येत होतं!
 “सर... तुम्ही खरंच माझे गुरू आहात!", अशाच एका क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं केरळला ट्रेननं जाताना, कशावरून विषय निघाला होता कोण जाणे. बेबी बोलून गेली होती. “केवळ गुरूच नाही, तर फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईडसुद्धा."
 “बेबी, मी केवळ तुझा कोच आहे. तोही नोकरी करणारा. एन. एस. आय. कोच. मी फार काही करतोय असं नाही. इतकंही एका माणसानं दुस-या माणसाला मानू नये..... त्याला मग अहंकार होतो की, आपण खूप काहीतरी आहोत."
 “सर... आय स्वेअर! मी खरं बोलतेय, पण मला यापुढे जाऊन म्हणायचं आहे की, त्याहून तुम्ही माझ्यासाठी काकणभर जास्त आहा. ते काय, मला सांगता येणार नाही, पण...' ते तिचे शब्द आजही गुरूच्या स्मरणात आहेत.
 त्यावेळी तर मनमानस एक अनाम आनंदाची व उत्तेजनाची कारंजी थुईथुई उडवत चिंब झालं होतं! तो प्रसंग कर्नालला शंभर मीटर धावण्याची स्पर्धा बेबीनं नव्या राष्ट्रीय उच्चांकासह जिंकली होती. तिनं क्रमांक एकच्या मधल्या प्लॅटफार्मवर उभी राहून मान वाकवीत सुवर्णपदक महनीय राज्यपाल महोदयांच्या हस्ते स्वीकारलं होतं. गुरू भरलेल्या डोळ्यानं तो क्षण एकटक पाहात होता. एक कोच, एक प्रशिक्षक म्हणून त्याच्यासाठी दिवस मोठा भाग्याचा होता. कारण ती ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरू शकत होती.
 त्यासाठी बेबीवर कडी मेहनत घ्यायची आणि भारताचं अॅथलेटिकमधलं पदक तिच्या रूपानं महाराष्ट्राला पुन्हा मिळवून द्यायचं. यापूर्वी फक्त १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये. खाशाबा जाधवानं कुस्तीतलं पहिलं पदक मिळवलं होतं. बेबीत ती क्षमता खचितच होती!

 पत्रकारांनी तिला पदक स्वीकारल्यानंतर तिथंच गाठत प्रतिक्रिया विचारली. प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा! ती उत्स्फूर्तपणे म्हणाली होती, “माझं हे पदक माझ्या राज्यासाठी मिळवलंय आणि माझ्या गुरूंसाठी, टीचरसाठी. त्यांच्याविना मी कुणी नाही. केवळ एक मातीचा गोळा होते. त्यांनी मला घडवलं. मी मी त्यांचे शिल्प आहे, त्यांची निर्मिती आहे. आता गुरूच्या डोळ्यात अश्रृंची गर्दी झाली आणि त्यानं प्रयत्न करूनही ते चुकारपणे एक एक, दोन -दोन करीत ओघळत राहिलेच. याचं त्याला भान नव्हतं! पण त्याला मित्र व गुरू-मार्गदर्शकापेक्षा अधिक काही मानणाच्या बेबीचं त्याच्याकडे जरूर लक्ष होतं! हा खरा गुरू आपला. अगदी जवळचा. फार सच्चा, खोलवर मनात उतरलाय. आपल्या पराक्रमानं आनंदाश्रू ढाळतोय..... पत्रकार, टीव्ही व स्टिल कॅमेरामनची गर्दी दुस-या क्रीडा स्पर्धेसाठी बाजूच्या स्टेडियममध्ये निघून गेली आणि बेबी मघाशी ज्या वेगानं पळत होती त्याच वेगानं धावत त्याच्या जवळ आली आणि जगाचं भान हरवून त्याला तिनं मिठी मारली.

१२६ । लक्षदीप