या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे. ‘गोडी अपूर्णतेची लावी जिवास वेड’ हेच खरं.
 मला जुने सिनेमा आवडतात. टीव्हीवर आजच अमिताभ-राखीचा सिनेमा पाहिला. 'बेमिसाल, त्यात अमिताभ राखीला 'सखी' म्हणतो. या नात्याचा अर्थ सांगताना तिचा बाप ए. के. हनगल म्हणतो. 'महाभारतात श्रीकृष्ण द्रौपदीला सखी म्हणायचा आणि ती त्याला सखा."
 गुरू, तुम्ही माझे सखा आहात, पण, पण मी तुम्हाला हे कधीच सांगणार नाही. आपला समाज ते समजणार नाही, पण एक विचारावंसं वाटतं. 'तुम्हाला मी कधी सखी वाटेन का हो?'
 पुन्हा गुरूचे डोळे झरू लागतात. “बेबी, सखी... होय, होय आज मी तुला सखी म्हणतोय. पण ते ऐकायला तू कुठे आहेस? मला समजायला फार उशीर झाला गं!”
 डायरीचं आणखी एक पान.
 उद्या माझा बालाजीशी विवाह होणार. मन बेचैन आहे. मला तो समजून घेईल का? माझ्या व गुरूच्या नात्याला? आणि माझं धावपटूचं करिअर... तो मला साथ देईल? मला गुरूचं ऑलिम्पिकचं स्वप्न साकार करायचं आहे; पण त्यामध्ये माझा विवाह आड नाही येणार? अंजू बॉबी जॉर्जचा नवराच तिचा गुरू, कोच आहे. इथं माझा नवरा मला समजून घेईल? प्रोत्साहन व साथ देईल? तो तसं म्हणतोय खरा, पण त्याचा स्वर सच्चा का वाटत नाही? त्यावर विश्वास का बसत नाही? आणि मुख्य म्हणजे त्याची नजर मला आश्वस्त करणारी का वाटत नाही?
 प्रश्न, नुसते प्रश्न.
 माझा हा मूक संवाद आहे तुमच्याशी गुरू"
 "गुरू, आज ज्याची भीती वाटत होती तेच घडलं. माझी डायरी नव-याच्या हाती पडली. त्यात आपला तो कर्नालिचा फोटो होता. बालाजी भडकला आणि मला चक्क व्यभिचारी ठरवीत त्यानं 'छिनाल', रांड' अशा शिव्या दिल्या. मारहाणही केली. मी ती सहन केली. का? कळत नाही. भारतीय स्त्री नेहमीच अशी दुबळी असते का हो? नवच्यापुढे पड खाणारी? पण जेव्हा त्यानं तुम्हाला नावं ठेवायला सुरुवात केली, मी न राहवून त्याला स्पष्ट सुनावलं,
 “तुम्ही मला नाही नाही ते बोललात. मारहाण केलीत. मी सहन केलं. तुमची लग्नाची बायको म्हणून. पण गुरूबद्दल काही बोलू नका. मी ते ऐकून घेणार नाही."
 “कसं ऐकशील याराबद्दल? छिनाल, रांड साली. पुन्हा त्याच गलिच्छ शिव्यांची बरसात.
 "मी शिंदळकी नाही केली हो.” मी कळवळून म्हणाले.

 "खंडोबाची शप्पथ घेऊन सांगते, मी तुमच्याशी एकनिष्ठ आहे. आणि गुरू है

१३४ ॥ लक्षदीप