या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "प्लीज, एवढं माझं ऐका, हे केवळ माझं नाही तर माझ्या गुरूचंही स्वप्न आहे."
 “खबरदार, त्या याराचं नाव काढलंस तर...”
 ते दिवस माझ्यासाठी काळेकुट्ट होते सर. माझं करिअर संपलं होतं. तुमचं माझ्याबाबत पाहिलेलं वे मला जे साकार करायचं होतं, ते स्वप्न भंगलं होतं? माझ्यासाठी प्रत्येक रात्र पाशवी बलात्काराची होती. 'तुला पुन्हा गर्भार केली पाहिजे. तरच तू घरात गुंतून राहशील.'
 चार पाच महिने मी नव-याचा हा सैतानी छळ सहन करीत होते. मला त्या काळात दिवस गेले नाहीत. म्हणून बालाजीनं माझी डॉक्टरी तपासणी करून घेतली. गर्भपाताच्या वेळी गंभीर इजा झाली होती. म्हणून माझे युटेरस तेव्हा डॉक्टरांनी काढलं होतं. मी कधीच आई होऊ शकणार नव्हते.
 एकाच वेळी त्याचा विषाद वाटत होता आणि हायसंही. सैतानाचा गर्भ तसाच पुढं सैतान निपजला तर?
 त्याचा छळ वाढत होता. सासू म्हणत होती, "तिला टाकून दे.. किंवा फारच दया वाटत असेल तर दुसरा घरोबा कर. ती राहील मोलकरणीसारखी घरचं काम करायला...."
 माझं कसं व्हायचं सर? मी - मी काय करू?”
 डायरीचं शेवटचं पान त्रोटक होतं.
 माझ्या सहनशीलतेचा कडेलोट झालाय सर. मला आता सहन होत नाहीय, कितीदा तरी वाटलं. सारे बंध तोडून तुमच्याकडे यावं. तुम्ही मला नाही म्हणणार नाहीत, याचा विश्वास आहे.
 आज जाणवतंय गुरू की, मी खरंच तुमची होते. माझ्या मनात तुम्हीच होतात. हे - हे प्रेमच होतं, पण किती वेडी मी, मला आज जीवनाच्या अशा टप्प्यावर समजतंय, जिथून पुढे वा मागे जाण्याचा रस्ताच नाहीय.
 मला माहितये, आजचं डायरीलेखन हे शेवटचं आहे. म्हणून इथं मी कबल करते. माझ्या लग्न - संसाराच्या मर्यादा सोडून कन्फेस करते - आय लव्ह यू गुरू - तुम्ही मला हवे आहात. या जन्मी शक्य नाही. निदान पुढच्या जन्मी तरी माझे हाल ना? पुनर्जन्म असेल तर मला तो खरंच हवा आहे. तुमच्यासाठी. माझ्यासाठी आपल्या दोघांच्या सहजीवनासाठी आणि रनिंगसाठी. आय लव्ह यू सो मच.
 गुडबाय.

 त्या संध्याकाळी व्यंकट गुरूला भेटायला आला होता. तेव्हा तो शांतपणे म्हणाला, "नाहीं व्यंकट, मला तमाशा करायचा नाही, बेबीची विटंबना, बदनामी नकोय. त्या नालायकाला करू दे तिचा अंतिम संस्कार."

लक्षदीप ॥ १३७