या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "एक्सॅक्टली. मलाही तेच म्हणायचं आहे." सूर्यवंशी म्हणाले, “सिस्टिम बदलली पाहिजे. चांगल्या माणसांनी दृढतेनं चांगलं वागून वाईट माणसांना बाद केलं पाहिजे. व्हाईट करन्सी कॅन ड्राईव्ह आऊट ब्लॅक करन्सी फ्रॉम इकॉनॉमी, तसंच आहे हे."
 “पण हे शक्य आहे सर? तुम्ही काय, नंदिता मॅडम काय, अपवाद आहात या पोखरलेल्या भ्रष्ट दुनियेत. त्यामुळे भ्रष्टाचार आम असल्याचा व पूर्ण यंत्रणा सडल्याचा नियम अपवादानं नाही का सिद्ध होत?”
 सिद्धार्थ म्हणाला, “या तीन रात्रीनं मला एक रिअलायझेशन दिलंय, वुई हँव नो होपस्. धिस कंट्री डोंट नीड अस. काहीतरी डास्टिक केलं पाहिजे."
 "सिस्टिम बदलता येत नसेल तर तिचा भाग तरी बनलं पाहिजे." नामदेव हताश स्वरात म्हणाला, “त्यासाठी फार कोडगं मन लागतं. ते आम्ही कुठून आणायचं? सवाल तोच आहे. टू बी ऑर नॉट टू बी!”
 युवा पिढीच्या त्या तीन प्रतिनिधींच्या कडवट प्रतिक्रिया ऐकताना तो इन्स्पेक्टरही नकळत मऊ झाला होता. कारण काही वर्षांपूर्वी तोही नेमका याच दिव्यातून गेला होता. दोन वेळा तो पी. एस. आय. ची परीक्षा पास होऊही गृहविभागाला - तेव्हा त्यांच्या परीक्षा एम. पी. एस. सी घेत नव्हती, तर गृहविभाग घ्यायचा - मागणीप्रमाणे पैसे न चारता आल्यामुळे निवड झाली नव्हती. मग इजा बिजा - तिजा नको म्हणून तिसच्या वेळी लेखी परीक्षा पास झाल्यावर जमीन विकून पैशाची सोय केली आणि निवड झाली. पहिल्या वर्षातच दुप्पट जमीन खरेदी करून बापाला दिलासा दिला व भावंडांची सोय केली. मग भ्रष्टाचाराचा सिलसिला चालू झाला. एकदा सुरू झालेला भ्रष्टाचार थोडाच थांबतो? आज ती आपली विकृती न राहता सहज प्रकृती बनली आहे!
 त्या तीन डी. वाय. एस. पी. एकाच वेळी झालेल्या भावांपैकी एक जण आपला बॉस होता. त्यानं दारूच्या नशेत आपल्या बापानं प्रत्येक स्तरावर सारी यंत्रणा वेठीस धरत व पैसा चारत तिघांना कसं निवडून आणलं, हे कथन केलं होतं. तेव्हा वाटलं होतं, काळ किती झपाट्याने बदलत गेला. तेव्हाचा गृहविभाग सोवळा वाटावा इतकं आजचं एम. पी. एस. सी. कार्यालय भ्रष्ट झालं आहे. आणि गृहविभाग? आपण त्याचाच भाग आहोत. त्याचं काय सांगावं?
 आज त्या संतप्त युवकांच्या प्रतिक्रियेनं मन का हळुवार होतंय? कुठेतरी आतून हलल्यासारखं का वाटतंय?

 नाही, असं मऊ होणं आपल्याला परवडणारं नाही. आपण टफच राहिलं पाहिजे. या खात्यात शिरलो व भ्रष्टाचाराला मिठी मारली, तेव्हाच आपले परतीचे दोर कापले गेलेत. आपण आता सरळ वागू लागलो, तर आपल्या खात्यातील खेकडे आपलेच पाय खाली ओढतील. आपली पापं जगजाहीर करीत आपल्याला खड्यासारखं बाहेर काढतील... नो, आय कांट अफोर्ड इट.

लक्षदीप ॥ १४३