या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नको' असा सासरच्या मंडळींचा प्रेमाचा पण जुलमी आग्रह तिनं कधीही मनावर घेतला नाही. पण आज नवरा पण मुलगाच हवा म्हणत होता. आणि केवळ आग्रह नव्हता, त्या पलीकडचं काही होतं. हे तिला त्या क्षणी फार खटकलं होतं.
 “राजा, मी आई होणार आहे, याचा मला स्त्री म्हणून आनंद आहे. मुलगा की मुलगी हा सवाल गौण आहे." ती म्हणाली, “मला सांग, काही झालं तरी तुझ्या बापपणात काही फरक का पडणार आहे? तिचा किंवा त्याचा तू पप्पाच होणार आहेस, हे महत्त्वाचे नाही का?"
 तो चूप झाला होता. पण त्याच्या सुप्त व अबोल मनात अस्सल पुरुषी विचारतरंग उमटत होते. आणि त्याला एकच स्वर होता, एकच ध्यास होता - मला मुलगा हवा. मुलगा.
 का नको आपल्याला मुलगी? त्याच्या विवेकी मनानं त्याला फटकारलं, तसा तो मनोमन निरुत्तर झाला. खरंच का आपल्याला मुलगा हवा - वंशाचा दिवा हवा?
 त्याचं ते विवेकी, विचारी मन त्याला सांगू लागलं, “बेट्या, ही खास भारतीय व आशियाई - पौर्वात्य मानसिकता आहे. कारण मनापासून आपण स्त्रीला हीन, दुय्यम लेखत आहोत. तिला शिक्षणाचा अधिकार नाकारून तिच्या प्रगतीच्या वाटा बंद केल्या आणि आपली पुरुषवर्चस्वाची श्रेष्ठत्वाची भावना रुजत गेली. खरं तर, वंशाचा दिवा, कुलदीपक किंवा म्हातारपणाची काठी म्हणून मुलगा हवा ही आधुनिक काळात सर्वथा फोल ठरलेली भावना आहे. तिच्या तू फार आहारी जाऊ नकोस."
 गणेश स्वतः एका मोठ्या आय. टी. कंपनीत बड्या हुद्द्यावरचा संगणक अभियंता होता. भारतात दर दहा वर्षाच्या जनगणनेत मुलींचे कमी होणारे प्रमाण व त्यामुळे उद्भवणाच्या सामाजिक समस्या त्याला माहीत होत्या. त्या डोक्यात होत्या. पण हृदयात शिरत नव्हत्या, मनाला भिडत नव्हत्या. त्यामुळे त्याच्या विवेकी मनाचे फटकार त्याला विचारांपासून परावृत्त करण्यास असफल ठरत होते.
 मुलगा हवा ही तीव्र लालसा त्याला अंबाबाईला कौल लावण्यास प्रवृत्त करत होती. त्याला स्वत:ला विचारानं कौल-नवस या बाबी निरर्थक वाटत होत्या. पण आपल्या होणा-या अपत्याचं लिंग काय आहे हे जाणून घेण्यासाठी तो आतुर होता. आपण ज्या उच्चपदावर काम करीत आहोत त्या पदाची आधुनिकता व त्याद्वारे निर्माण झालेली आपली मॉडर्न प्रतिमा, त्यामुळे स्वत: देवीला कौल लावण्याची मनोमन इच्छा असनही त्याला तो धजत नव्हता त्यामुळे त्यानं सरिताला कौल लावण्यास सांगितले.
 ती सश्रद्ध होती. तिच्या माहेरची व सासरची कुलदेवता अंबाबाईच असल्यामुळे तिनं कौल लावला. पण ती कौलाबाबत तटस्थ होती. तिला आई व्हायचं होतं व अपत्य मलगा की मुलगी ही बाब तिच्यासाठी गौण होती.

 त्यामुळे कौल मुलीच्या बाजूने पडला त्याचा तिला खेद मुळीच नव्हता.

१९८ । लक्षदीप