या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "आणि कौल जर मुलाच्या बाजूने असता तर?"
 "मी इथं राजकपूर व हृतिक रोशनची तसवीर लावली असती.” सरिता म्हणाली, “कदाचित हा खुळेपणा असेल, पण तो लोभस आहे. शास्त्रीय दृष्टीने नाही, पण माझं मन ग्वाही देत की, देवीचा कौल खरा ठरणार. आपल्याला मुलगी होणार. आत्तापासूनच माझ्या मनात तिची प्रतिमा तयार होतेय. तुझी बुद्धिमत्ता, तुझं आरोग्य घेऊन. तसंच - मी म्हणत नाही, तूच म्हणतोस ना, मी सुंदर आहे, त्यामुळे माझं, तुला आवडणारं, सौदर्य घेऊन आपली मुलगी जन्मास यावी."
 तिच्या या गोड व मधुर स्वप्नरंजनात गणेशला सामील होता येत नव्हतं. उलट ते त्याला इंगळ्या डसल्याप्रमाणे वेदना देत होतं. आपल्या मुलाच्या स्वप्नावर ते नांगी मारतंय व खिजवतंय असं वाटत होतं.
 तरीही तिचा त्याला राग करता येत नव्हता. तिला दुखवता येत नव्हतं. त्याला आपल्या पोटी माधुरीसारखी सुंदर कन्या नको होती, तर हृतिकसारखा बलदंड व देखणा मुलगा हवा होता!
 मनकवडी होत ती म्हणाली, “मला माहीत आहे, तुम्हाला पहिला मुलगा हवा होता, पण ते आपल्या हाती थोडंच असतं? देवीचा कौल आणि माझी मनोदेवता सांगते की मुलगी होईल. पण मुलगा झाला तरी मला आनंदच आहे. काही पण होऊ दे, आपण आई बाबा होणार हे महत्त्वाचं. पेढा काय, बर्फी काय? दोन्ही गोड ना!”
 कसला सण होता म्हणून तिनं पुरणपोळी केली हेती. ती कर्नाटकी पद्धतीची खरपूस भाजलेली चविष्ट पुरणपोळी करण्यात माहीर होती. तो तिच्या हातच्या पोळीवर नेहेमी आडवा हात मारायचा. पण आज तीच चव असूनही त्याच्यासाठी ती नासली होती. तोंडातच घास घोळत होता.
 त्याला स्वत:चा विलक्षण संताप येत होत. आपण का नाही दैवावर सोडून देत जे होईल त्यांचा स्वीकार करायला तयार होत? सरितेनं नाही का म्हटलं, तिला मुलगी हेईल असं वाटतंय, पण मुलाचाही ती स्वीकार सहजतेनं करेल. आपणही असं का सहजतेनं मुलगा वा मुलगी, जे अपत्य होईल. त्यांचा स्वीकर करू शकत? मुलाचा अट्टाहास का?
 आणि त्यासाठी मनातला जागा झालेला सैतान आपण का कुरवाळत आहोत? तो सैतान पण मनमानस पोखरतोय, तरीही त्याला हुसकून लावावसं वाटत नाही.
 पण त्या सैतानाचा कानमंत्र पटला असूनही आपला जीव का धजत नाही ते करायला?

 सरितेच प्रेम? होय, ते मागे ओढतेय, तिची नाजूकता हा आपल्या प्रीतीचा पवय. आज त्या नाजूकतेची काळजी वाटतेय. उद्या तिची तब्येत बिघडून पुन्हा गर्भधारणा होणार नसेल तर?.....

लक्षदीप ॥ २०१