या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मी धावतच पुढे गेले. “डॉक - डॉक”
 केवढे दचकले ते मला पाहून. मला कळेना!
 "क - काय झालं? माझं काही चुकलं का?" क्षणार्धात मी रडवेली होत म्हणाले.
 "न - नाही. नाही. मला खबर नव्हती म्हणून चकित झालो एवढंच!”
 त्यांच्या सोबत एक माणूस होता आणि पाठीमागून जिवा-शिवा ते दोन भयंकर हॉऊंड जातीचे कुत्रे घेऊन येत होते. त्यांचे गुंजेसारखे डोळे व लवलवत्या लाल जिभा.... मी भेदरले. “डॉक, मला भीती वाटते त्यांची. त्यांच्या जिभेवर रक्त आहे का? एवढ्या लाल का दिसतात त्यांच्या जिभा?"
 पुन्हा त्यांचं तसंच दचकणं व पुन्हा सावरत मला दिलासा देणं, “वेडी कुठली. घाबरू नकोस."
 आणि आवाज चढवीत त्यांनी म्हणलं, “जिवा - शिवा .. जा, ती दोन्ही कुत्री खोलीत बांधून ठेवा!"
 त्यांचा चढलेला आवाज ऐकून मी तर भेदरलेच. पण जिवा - शिवाची जोडी पण सटपटली, त्यांच्या हातातले साखळदंड निसटले. ती दोन कुत्री मोकळी सुटली आणि आमच्या बाजूने समोर धावत सुटली.
 डॉकचे पुन्हा ओरडणं. जिवा - शिवाचं धावणं. मी थरथरत होते.
 आणि एक बाल किंकाळी ऐकू आली. माझ्या जिवाचं पाणी पाणी झालं. ही ही माझ्या बाळाची किंकाळी तर नाही?
 माझ्या जिवाचा ठाव सुटला. भीतीनं व अनिष्ट भयसूचक जाणिवेनं रक्ताचं पाणी पाणी झालं.
 “राजा - माझ्या बाळा...." असं हुंदका दाबीत मी ओरडले व धावत सुटले
 समोरचं दृश्य पाहून मी जिवाच्या करारानं त्या कुत्र्यांवर धावून गेले. त्यांनी - त्यांनी माझ्या बाळाच्या पायाचा लचका तोडला होता.
 बाळाच्या अंगावरची दुलई सरकली होती व त्याचे इवले गुलाबी पाय उघडे पडले होते. डावा पाय रक्ताळला होता. त्या कुत्र्यांनी ते पाय पाहिले असावेत... आणि ...आई गं!
 डॉक प्रथम हतबुद्ध. मग पिसाळल्याप्रमाणे स्वरक्षणासाठी घेतलेले व सदैव आपल्या सफारीत कमरेपाशी बांधून ठेवलेले पिस्तूल काढले व सरळ दोन्ही कुत्र्यांवर गोळ्या चालवल्या. एकामागून एक दोन्ही कुत्रे कोसळले व आचके देत काही क्षणात गतप्राण झाले!

 माझं बाळ रडत होतं - वेदनेनं तडफडत होतं. माझ्या अंगातलं सारं बळ ओसरलं होतं! आणि उरी फुटत मीही रडत होते!

लक्षदीप । २१७