या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "बेटा, आम्हाला माहीत आहे सारं काही. तुलाच ज्ञात नाही आणि त्यानं त्या दुपारी ती झोपली असताना तिच्या वस्त्रात कसा सर्प शिरला व ती कशी विषकन्या बनली हे सांगितलं, आणि आश्वस्त केलं की, तिला त्यांची जमात जादूई शक्तीनं बरं करेल....
 थंडर जमातीच्या माणसांनी मंत्रोपचारानं व आपल्या अदभुत शक्तीनं तिला बरं केलं. पूर्ववत केलं, आणि सांगितलं, “जा आता आपल्या माणसांत, तू पूर्ण बरी झाली आहेस. जा, सुखात संसार कर! या पुढे तुला दुनिया ‘मेड ऑफ दि मिस्ट' या नावानं ओळखेल!"
 आमच्या गाईडनं कहाणी पूर्ण झाल्यावर खुलासा करीत म्हटलं, “यू नो फ्रेंडस् ‘मेड ऑफ दि मिस्ट' चा अर्थ दवबिंदूप्रमाणे अनेक छोटे जलकण एकत्र धुक्यासारखा पण काहीसा दाट लोट होय. धबधब्याचं पाणी खाली फेकलं जात असल्यामुळे जे तुषारकण दाट स्वरूपात वर येतात त्याचे निर्देशक आहे - ‘मेड ऑफ द मिस्ट'.
 या नावानं १८४६ पासून बोट चालते. ती प्रवाशांना धबधब्याच्या जास्तीत जास्त जवळ नेते, त्यांच्या मागे असलेल्या 'थंडर' ची वाणी ऐकण्यासाठी, पण त्या काळानंतर माणसे जास्तच स्वार्थी व अविश्वासू बनली आहेत व त्यांचे कान ‘थंडर जमातीची वाणी ऐकण्यास सक्षम राहिले नाहीत.
 पण ‘मेड ऑफ दि मिस्ट' ची कहाणी, बोटीनं धबधब्याच्या प्रपातापर्यंत जाणं हेच सूचित करत असतं की, माणसानं त्या काळाप्रमाणे निसर्ग, पृथ्वी व आकाशाशी तादात्म्य पावावं, म्हणजे त्यांचे आवाज ऐकता येतील! आणि जग किती तरी अधिक सुंदर होईल. या नायगराच्या सौंदर्याप्रमाणे...
 आता अंधारून आलं होतं. पण नायगरादर्शन पूर्ण झालं नव्हतं. रात्रीची विद्युत रोशणाई अद्याप पाहायची होती! गाईडनं अशीही माहिती दिली की, २१ मे ते ४ सप्टेंबर पर्यंत दररोज रात्री १० वाजता आपल्याकडे दिवाळीत जशी आतषबाजी होते, तशी केली जाते, ती हा ऑक्टोबर महिना असल्यामुळे पाहाता येणार नव्हती, त्यामुळे काहीशी हळहळ वाटली. (पण त्यावेळी आम्हाला कुठे कल्पना होती की सिरंक्यूस जवळच्या ओनांडोमा तळ्याच्या काठी २५ नोव्हेंबरला 'थेंक्स गिव्हींग' तारखेला आतषबाजी तळ्याकाठी पाहायला मिळेल!)
 दिवसभर भटकून भूक लागली होती. आमचा मित्र आम्हांस 'कोहिनूर' या भारतीय पद्धतीच्या हॉटेलमध्ये जेवायला घेऊन गेला. तिथं पंजाबी पद्धतीचे चवदार भोजन मिळालं. वर ‘डेझर्ट' म्हणून तांदळाची खीर! तृप्त मनानं आम्ही पुन्हा धबधब्याकडे वळलो.

 सारा परिसर विद्युत रोशणाईनं झगमगून गेला होता. आम्ही श्री सिस्टस बेटावरून धबधबा पहात होतो. दिवसाचे शुभ्रधवल पाणी कधी गुलाबी लाल, तर कधी

२८६ । लक्षदीप