या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३. हत्तींचा अनाथ आश्रम


 जगल म्हटलं की ‘जंगल का कानून'प्रमाणे तिथं दुबळ्या, जखमी व स्वत:चं अन्न-पाणी मिळवू न शकणाच्या जनावरांना स्थान नसतं हे निसर्गाचं अमानुष असलं तरी रोकडे सत्य आहे.
 पण कल्पना करा; एक हत्ती शिका-याच्या गोळीनं दोन्ही डोळ्यांनी अंध झाला आहे दुसरी एक हत्तीण जंगलात पेरलेल्या सुरुंगामुळे जखमी होऊन तिच्या चार पायांपैकी एक पाय चक्क फूट-दीड फूट कमी झाला आहे व तिला तीन पायावर प्रचंड शरीराचा भार वाहावा लागतो आहे. आणखी एक हत्ती आहे, दहा वर्षाचा झाला तरी त्याच्या घशात विकार झाल्यामुळे हत्तीचं अन्न - विविध झाडांची पाने व खाद्य त्याला खाता येत नाही. दूध व पाण्याखेरीज काही गिळता येत नाही. जंगलाचा कानून जर खरा असेल तर हे तिन्ही हत्ती काही दिवसही जंगलात जगू शकणार नाहीत. पण आज हे तिन्ही हत्ती सहीसलामत असून छानपैकी जगत आहेत.
 कारण त्यांना लाभला आहे जगातला एकमेव असलेला अनाथ आश्रम, हत्तीचा अनाथ आश्रम, श्रीलंका देशात हे ‘पिनावाल एलेफंट ऑर्फनेज' आहे ते मला श्रीलंका भेटीत पाहायला मिळालं आणि एक वेगळा अनुभव मला मिळाला. कोलंबो शहरापासून ऐंशी किलोमीटर अंतरावर हे रेल्वे स्टेशन आहे, तेथून दोन किलोमीटर अंतरावर हो पिनावालचा हत्तीचा अनाथ आश्रम ‘माओया' या नदी-किनारी आहे. तो सुमारे पंचवीस एकर जमिनीवर वसला आहे. तिथे सध्या त्र्याहत्तर हत्ती आहेत. १९७५ साली अनाथ आश्रमाची सुरुवात झाली. जंगलात ज्या हत्तींना त्यांच्या माता नाहीत, अशी अनाथ हत्तींची रक्षा व्हावी व त्यांना नीट, शक्यतो नैसर्गिक वातावरणात जगता यावं म्हणून तो वसवला गेला आणि अनाथ हत्तींना आपलं एक हक्काचं, माणसांनी बनवलेलं, घर मिळालं!

 हत्तींना अनाथ रूप कसं येत? एक कारण म्हणजे हत्तीच्या आईचा नैसर्गिक मृत्यू; दुसरं म्हणजे माणूसरूपी शिका-याचं होणारं आक्रमण. तिसरं कारण श्रीलंकेमध्ये जो लिटेचा स्वतंत्र होण्यासाठी सशस्त्र झगडा चालू होता, त्याचाही

लक्षदीप ।। २८९