या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाकादंबरी ‘इन्किलाब विरुद्ध जिहाद’ आणि ‘पाचवी शहाबानो' मिळून काही कथांमुळे ‘मुस्लीम विषय हाताळणारा साहित्यिक' अशी माझी ओळख झाली आहे, ती मला महत्त्वाची वाटते. कारण भारतातील हिंदू समाजात मुस्लिमांविषयी प्रगाढ अज्ञान आहे. ऐतिहासिक पाश्र्वभूमीमुळे संशयाची व फाळणीमुळे मुस्लिमांविषयी द्वेषाची भावना अनेक हिंदूंच्या मनात असते. त्यांचं जगणं, त्यांचे संघर्ष, त्यांचा धर्म व परंपरा आदीविषयी फारच कमी माहिती असते. परंतु मी मूळचा मराठवाड्याचा, जो निजामी राजवटीखाली काही शतकं होता, म्हणून माझा मुस्लीम समाजाशी जवळून संबंध आला आणि ऊर्दू साहित्याच्या वाचनामुळे त्याच्या अंतरंगातही डोकावता आलं. मागे कुरुंदकर व आता शेषराव मोरे यांच्यामुळे इस्लाम धर्म व परंपरांचा माझा अभ्यास होत गेला. त्यामुळे हा समाज समजून घेताना लिखाण घडत गेलं. पुन्हा प्रशासक म्हणून दंगली, साक्षरता अभियान आणि जातीय सलोखा आदी विषय हाताळताना मुस्लीम समाजाशी सातत्याने संवाद होत गेला, माझं मुस्लीम समाजाविषयीचं ललित लेखन, कथा व कादंब-या हा त्याचाच परिणाम आहे.
 आधी उपजिल्हाधिकारी व मागील पाच सहा वर्षांपासून आय.ए.एस. म्हणून जवळपास एक तृतीयांश महाराष्ट्रात विविध पदांवर काम करीत, पाणी टंचाई, दुष्काळ, महापूर, रोजगार हमी, नागरी प्रशासन, ग्रामीण विकास असे विषय हाताळताना, माझ्यातला संवेदक्षम लेखक आणि अभ्यासक त्यांच्याशी भिडत गेला. लेखनातली कल्पकता व माणसाच्या प्रश्नांमागची धग व वेदना समजून घेत भिडण्याच्या पद्धतीमुळे मला प्रशासकीय कामात बरंचसं यश मिळालं. लेखकाला विविध अनुभव प्रत्यक्ष वा अभ्यास-चिंतनातून घेता आले पाहिजेत. मात्र महसूल खात्याच्या आणि आय. ए. एस. च्या प्रशासकीय नोकरीमुळे जिवंत, थक्क करणारे अनुभव व मानवी प्रवृत्ती माझ्याकडे चालत आल्या. त्यांची कामं करताना व समस्या सोडवताना आलेले अनुभव मी टिपकागदाप्रमाणे टिपून ठेवले, त्यांचाही लिखाणासाठी उपयोग झाला, नगरपालिका कारभाराच्या काळ्या अंतरंगावर प्रकाश- झोत टाकणारी माझी ‘अंधेरनगरी' ही कादंबरी किंवा तहानलेल्या महाराष्ट्राचा ‘उदक' हा कथासंग्रह म्हणजे माझ्यातील प्रशासक व साहित्यिक यांचा (माझ्या मते) सुरेख संगम आहे.

 माझी जडणघडण झाली ती सर्वआयामी शिक्षणामुळे. मी रसायनशास्त्राचा एम. एस्सी. पदवीधर. लातूरला प्रांताधिकारी असताना बहि:स्थ विद्यार्थी म्हणून एम. ए. (मराठी) प्रथमश्रेणीत केलं. माझी पहिली नोकरी बँकेतली. तिथे एम. कॉम.शी समकक्ष सी. ए. आय. बी. ची परीक्षा पास झालो होतो. म्हणजे मी कला, वाणिज्य व विज्ञान या तिन्ही शाखांचा पदव्युत्तर विद्यार्थी आहे. या खेरीज तीन वर्षांपूर्वी भारत शासनाच्या वतीने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बंगलोर यथे एम. बी. ए. केलं. तेथे जागतिकीकरणासोबत शिक्षण, आरोग्य व दारिद्र्य या विषयांचाही अभ्यास केला.

लक्षदीप ॥ २९९