या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समस्या घेऊन त्या वास्तवाचे विविध लक्ष्यी अक्ष शोधले.
 गेल्या स्वातंत्र्योत्तर काळात ज्या महाराष्ट्रीय मध्यमवर्गीय समाजाची वाटचाल झाली त्या वाटचालीच्या समाजशास्त्राचा आणि देशमुख यांच्या जीवनदृष्टीचा जवळचा संबंध आहे.या काळातील सुशिक्षित मध्यमवर्गीयांचे आदर्श,स्वप्नांकाक्षा,तीमधून प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे ध्वनित झाली आहे.देशमुख स्वत:ला स्वातंत्र्यानंतरच्या व नव्वदीआधीच्या मधल्या काळातले प्रतिनिधी मानतात.या काळातील सामाजिक व वाङ्मयीन वातावरणाचा त्यांचा व्यक्ती व लेखक म्हणून असण्यावर परिणाम झालेला आहे. जीवनविषयीच्या या मध्यमवर्गीयांच्या कल्पना,व्यक्तिमत्त्व रचण्यातली कल्पना व स्वत:ला घडविण्यात ज्या गोष्टींचा सहभाग होता,त्याबद्दलचा आदर्शवत दृष्टिकोन तीमध्ये आहे.तसेच या काळातील शिक्षितवर्गाच्या आवडी-निवडी त्यांच्या खास अशा कल्पनांमधून साकार होत होत्या.ज्या भावगीतांनी व भावसंगीताने व हिंदी चित्रसृष्टीने या काळातील शिक्षित मनाचे पोषण केले त्याचा आविष्कार लेखनभाषेतून झाला आहे. हिंदी गाण्यांचे,चित्रपटाचे व मराठी भावगीतांचे अनेक तपशील देशमुखांच्या लेखनात आहेत.तसेच या काळातील या समाजाची घडण ज्या माध्यमांनी,साहित्यांनी केली त्याचाच हा आविष्कार आहे.
 सामाजिक प्रश्नांची मांडणी करण्यासाठी देशमुख यांच्या साहित्यदृष्टीमध्ये नेहमी एका लोकशिक्षकाची आदर्शवादी भूमिका वसत आलेली आहे.समस्यामुक्त समाज निर्माण व्हावा या आदर्शवादी भूमिकेतून त्यांच्या साहित्याचे कथन नियंत्रित झाले आहे.या भूमिकेचा पगडा त्यांच्या जीवनचित्रणावर, पात्रसृष्टीवर व भाषेवर आहे.आदर्शवादी नायकाच्या निर्मितीतून या समाजव्यवस्थेचे निरीक्षण केलेले आहे. अंतिमत: ज्या प्रश्नांचे सूतोवाच प्रारंभिच केले आहे.त्याची दाहक वास्तवता,विविध कंगोरे प्रत्ययास आणून देऊन शेवट सकारात्मक असा केलेला असतो.तो ब-याच वेळेला सुखान्त स्वरूपाचा असतो.‘आदर्शाची व मांगल्याची आस असलेली नजर मला प्राप्त झाली आहे' असे स्वतः त्यांनी म्हटले आहे.या आदर्शवादी मूल्यविवेकाची जागती नजर त्यांच्या एकूण लेखनावर आहे.म्हणून त्यांच्या साहित्यदृष्टीत आदर्शवादी युटोपियाला महत्त्वाचे स्थान आहे.त्यांचे लेखनाचे अनेक विषय या जाणीवकेंद्राने नियंत्रित झाले आहेत. निराशावादी सिनिकल वृत्ती अव्हेरून मानवी जीवनातील साफल्याचे व आशावादीपणाचे सूचन त्यांच्या वाङ्मयात आहे.मराठी वाचक त्यांच्या नव्या अनुभवक्षेत्राच्या साहित्यकृतीच्या प्रतीक्षेत असेल.

डॉ. रणधीर शिंदे

लक्षदीप २९