या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुख्य म्हणजे या सर्व क्षेत्रातील वैचारिक ग्रंथ व मासिकं मी सातत्याने वाचत असतो. मला ज्ञानशाखांचं आकर्षण आहे व त्यातलं किमान कळतं, माहीत असतं. याचा उपयोग मला प्रशासनात आणि लेखनातही होतो.
 त्याचं एकच उदाहरण देतो. बालमजुरी किंवा बाल कामगार हा मला सतत अस्वस्थ करणारा प्रश्न आहे. छोटी मुलं रेल्वेस्टेशनवर, हॉटेल व धाब्यांमध्ये काम करतात. जगण्यासाठी व गरीब आईबापाच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यांना खेळ व शिक्षणाच्या कोवळ्या वयात बारा तास कामाला जुंपून घ्यावं लागतं. त्यांचं होणारं शोषण, त्याचं हरवणारं बालपण व अकाली प्रौढ होणं (हिंदी कवी अशोक चक्रधराच्या शब्दांत, “बूढे बच्चे' होणे) हे माझ्यातल्या लेखकाला व माणसाला अस्वस्थ करायचं आणि प्रशासकाला आव्हान द्यायचं. मी अकोल्यात महानगरपालिका आयुक्त असताना 'नवजीवन' प्रकल्प कल्पकतेनं राबवून (ज्याची राष्ट्रीय बालहक्क आयोगाच्या अध्यक्ष मॅगसेसे पारितोषिक विजेत्या शांता सिन्हाजींनी प्रशंसा केली.) सहाशे बालकामगारांना शाळेत दाखल केलं. हा माझ्या सेवाकालखंडातला उत्कर्ष बिंदू आहे, असं मी मानतो. संधी मिळाली तेव्हा, आय. आय. एम. बंगलोरला एम. बी. ए. करताना बालकामगारांवर संशोधन करून मी प्रबंध सादर केला. त्यानंतर सांगलीला जिल्हा परिषदेवर काम करताना १०० टक्के मुलं शाळेत जातील व त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल यासाठी प्रयत्न केले. हे प्रशासकीय काम करीत असताना माझ्यातला लेखक सतत जागा होता. त्याला यात एक कादंबरी दिसत होती. ती मी नुकतीच लिहून पूर्ण केली आहे आणि लवकरच ती प्रकाशित होईल.
 माझ्या जडणघडणीचं व जगण्याचे सूत्र थोडक्यात सांगायचं झालं तर, प्रशासक म्हणून ज्या ठिकाणी व ज्या पदावर नियुक्ती मिळेल, तिथं त्या त्या क्षेत्रात काही तरी मूलगामी काम करून समाज व देशाच्या विकासाला कणमात्र हातभार लावणं, आणि तत्त्वासाठी, नैतिकतेसाठी संघर्ष करताना आलेले अनुभव आणि त्यामागच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक वृत्ती यांच्या आधारे लेखन करणं हे आहे. एकाच वेळी मी प्रशासकही असतो व लेखकही असतो. कामाचा भाग म्हणून बेकायदेशीर झोपड्या तोडल्या आहेत, पण अधिकार वापरून त्यांचे पुनर्वसनही केलं आहे. अकोल्याला घरपट्टी वाढवली, टाकाऊ व आवश्यक नागरी सेवाही दिल्या आणि त्यावर आधारित कथाही लिहिल्या. माझी ‘अग्निपथ' ही कथा रस्त्याच्या कामाचं राजकारण केलं जातं व चांगल्या अधिका-याला कसं बदनाम केलं जातं, यांचे चित्रण करते.

 सदैव जागृत असणारं कुतूहल, चौकस वृत्ती व नवी-नवी माहिती मिळवण्याची जिज्ञासा हे माझं भांडवल आहे. संवेदनक्षम मन, विविध ज्ञान-शाखेतला संचार व अफाट वाचन यामुळे प्रश्न व समस्या यांचं आकलन होतं, यामुळे प्रशासक म्हणून काम करताना 'आऊट ऑफ बॉक्स' विचार करीत त्यांना भिडता येतं व त्या प्रश्नांचं

३० ० । लक्षदीप