या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

माझा नायक यमाकडे त्याच्या मृत पत्नीला जिवंत करण्याची मागणी करतो आणि ती त्याला त्याच्या निम्म्या आयुष्यातल्या बदल्यात मिळेल, ही यमदेवाची अट मान्य करतो. पत्नी पुन्हा जिवंत होते, पण त्यांच्या संसाराचा सूर बदलतो. आपलं आयुष्य कमी झाल्याची जाणीव त्याला सतत अस्वस्थ करीत राहते. जीवनाची व अधिक जगण्याची त्याची लालसा उफाळून येते आणि मग त्याचं पत्नीवरचं प्रेम संपून जातं व नंतर तो तिचा द्वेष करू लागतो. ती त्याने दिलेल्या जीवनदानामुळे कृतज्ञ असते, पण त्याचे बदललेलं रूप तिला भयचकित करतं, व्याकूळ करतं. हे स्त्री-पुरुष प्रकृतिधर्माचं सनातन स्वभावदर्शन त्या कथेतून मांडताना (सावित्री-सत्यवान मिथक, पती-पत्नी प्रेमाची भारतीय परंपरा आणि जन्ममृत्यू - पुनर्जन्म - वरदान या कल्पना यांची एक भारतीय - एक हिंदू म्हणून असते तेवढी माहिती मला होती.) ज्या पद्धतीनं स्त्री-पुरुष स्वभावरचनेवर मला प्रकाश टाकायचा होता, त्यासाठी पुन्हा एकवार वाचन करून आजच्या काळाच्या संदर्भात ते सर्व समजून घेतलं. कथेचा दुसरा ड्राफ्ट करताना कथानकाच्या ओघात सहजतेनं येतील तेवढेच संदर्भ घेतले आणि एक ‘फॅन्टसी' असलेली पण जीवनविषयक गंभीर भाष्य करणारी कथा जन्माला आली. त्या कथेसाठी मी स्त्री - प्रवृत्ती व पुरुष - प्रवृत्तीविषयी बरंच वाचन केलं. त्यामुळे माझी स्त्री - पुरुष मानसिकतेची जाण अधिक सखोल झाली. ते सारं समजून घेताना, स्वानुभवाशी, विचारांशी ताडताना वेगळाच बौद्धिक आनंद मिळाला. जे अभ्यासलं ते सारं लेखनात वापरलं नाही, तसं वापरायचंही नसतं. मात्र पात्रांची पाश्र्वभूमी तयार करणे व त्यातून सहजतेनं कथानक घडवणं, हे लेखकाचं कौशल्य असतं. मला इथे एवढंच सांगायचं आहे, की कथानकाचा आशय व आवाका, पाश्र्वभूमीवरील कथानकाशी एकजीव झालेल्या संदर्भामुळे वाढतो. त्यामुळे वाचकाला एक सकस जीवनानुभव देता येतो.

 इस्लामी जीवनावर ललित लेखन करणं ही माझ्यासारख्या हिंदू लेखकासाठी कठीण नसली, तरी अवघड बाब जरूर होती, पण मुस्लीम समाजाशी असलेला संपर्क, उर्दू साहित्याचे वाचन आणि मुस्लीम समाजाबाबतच्या इंग्रजी ग्रंथांच्या अभ्यासामुळे माझी भूमिका तयार होत गेली. इस्लामी धर्माचं यथातथ्य दर्शन घडविण्यासाठी मात्र एवढं पुरेसं नव्हतं. त्यासाठी इस्लाम धर्माचा एकमेव ग्रंथ ‘कुराणे शरीफ' आणि ‘हादिस’ चा अभ्यासही आवश्यक होता. इस्लामी रीतिरिवाज, परंपरा, स्त्री-पुरुषाचं समाजातलं स्थान, कुटुंबविषयक कायदे, पडदा / बुरखा पद्धत हे सारं (सामाजिक, कौटुंबिक व सांस्कृतिक जीवन) अभ्यासातून व त्याहून जादा, एक माणूस म्हणून जाणून घेऊन मी लेखन केलं. त्याचं वाचकांनी व जाणकरांनी ब-यापैकी स्वागतही केलं. शासकीय नोकरीची बंधनं आणि इस्लामविषयी काही भाष्य करणं, हा भलताच सेन्सेटिव्ह विषय असल्यामुळे मते रुचली नाहीत, तर आमच्या धार्मिक भावना

लक्षदीप ॥ ३०९