या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शिक्षकांच्या गाठीभेटीसाठी); - माझी महसुलाची प्रशासकीय कामे सांभाळून देत होतो. तो माझ्यासाठी अक्षरश: मंतरलेला कालखंड होता.
 हा वर्षभराचा कालखंड मोजक्या शब्दात मांडणं अवघड आहे. म्हणून काही थोडके प्रसंग कथन करतो. असाच एक शुक्रवार. रात्री नऊ ते अकरा दरम्यान मी परभणी-गंगाखेड तालुक्यातील काही गावांत जाऊन तेथील प्रौढ साक्षरता वर्गाना भेट देत होतो. हायवेपासूनच्या एक आडवळणी गावात रात्री दहाच्या सुमारास पोहोचलो व सरपंचाला घेऊन पायी जाऊ लागलो. तोच समोरच्या दलित वस्तीपासून दोन प्रौढ महिला, पायांखालच्या वाटेवर बॅटरीचा प्रकाश मारीत येताना दिसल्या. त्या दोघी जिल्हा परिषदेच्या शिक्षिका होत्या व प्रौढ साक्षरता वर्ग आटोपून निघाल्या होत्या. त्यांना दोन किलोमीटर अंतरावर परभणीला जाणारी शेवटची बस मिळणार होती. मी त्यांची विचारपूस केली, तसं त्या म्हणाल्या, “सर, हे मोटिवेशन व कलेक्टर संधूसरांची प्रेरणा आहे. तुम्ही बाहेरचे, आमच्या जिल्ह्याच्या प्रौढ स्त्री-पुरुषांनी साक्षर व्हावं म्हणून एवढं करता, चक्क पदयात्रा काढता... मग आम्ही तर शिक्षक, शिकवणं आमचा पेशा. आम्ही शिकवणं यात कसलं नवल? उलट दलित वस्तीतल्या वर्गाच्या महिला वाचाय - लिहायला शिकल्या, त्याचं समाधान आहे..."
 विचार करा; रात्री दहाची वेळ. आडवळणाचं, अंधारात बुडालेलं गाव, अशा वेळी नऊ ते दहा दरम्यान तेथे परभणीला राहणा-या शिक्षिका, शाळा संपल्यावर पाचला न परतता, गावी थांबून साक्षरतेचे वर्ग घेतात व दलित स्त्रिया वाचताना पाहून समाधान पावतात... रात्री साडेदहाची शेवटची एस.टी., त्यासाठी दोन किलोमीटरची पायपीट करणं व रात्री अकराला परभणीला घरी पोहोचणं. मग जेवून झोपायला बारा वाजणार. पुन्हा दुस-या दिवशी सकाळी अकरा वाजता शाळेसाठी येणे... मला त्यासाठी प्रेरणा मानत होते, कर्ता-करविता समजत होते... यापेक्षा माझ्या कामाला अधिक दाद कोणती असू शकते? दुस-या दिवशी माझ्याइतकाच या कामात रस घेणा-या कलेक्टर संधू साहेबांना मी हा किस्सा सांगून म्हणालो, “सर, मार्क माय वर्डस्! आपलं हे अभियान यशस्वी होणार!” रमेश इंगळे जर परभणीला शिक्षक असते व या अभियानात सामील असते तर त्यांनी कशाप्रकारे कादंबरी लिहिली असती?

 दुसरा प्रसंग. श्रावण महिना म्हणजे स्त्रियांचं माहेरी जाणं- खास करून नागपंचमीला. त्यामुळे साक्षरता वर्ग काही दिवस बंद पडायचा धोका होता. एका वाडीत (तिचं नाव मी विसरलो) मी व साक्षरता अभियान समितीच्या दोन कार्यकत्र्याहेमा रसाळ व माधुरी क्षीरसागर यांच्यासह गेलो होतो, तेव्हा ही अडचण समोर आली. त्या गावात महिलांचे दोन साक्षरता वर्ग सुरू होते. महिलांना मी आवाहन केलं की, यंदा साक्षर नागपंचमी साजरी करायची. त्यांनी म्हणजे काय करायचं?' असं

लक्षदीप ॥ ३१५