या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, ते रॉकेल त्यांना योग्य दरात नियमित मिळावे म्हणून ना? मग का नाही माझ्यामागे त्या जनतेचं किंवा माझ्या वरिष्ठाचं बळ उभं राहिलं? अजून माझी जिद्द कायम आहे. मी हिंमत नाही हरलो, पण असेच दोन-चार अनुभव पुढे आले तर कदाचित मीही प्रवाहपतित होण्याचा धोका आहेच ना? ती कोणाची हार असणार आहे? माझी, का प्रशासनाची?"  चंद्रकांतला दिलासा देण्यासाठी इनसायडरजवळ शब्द नव्हते, चंद्रकांत म्हणत होता, “हेचि फल काय मम तपाला?"
 इनसायडरनं या संदर्भात एक पत्र सर्व वृत्तपत्रांना पाठवलं, ते केवळ हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेत्यांनी चालवलेल्या स्वतंत्र विचारसरणीच्या जिल्हापत्रात तेवढं छापून आलं. त्यात इनसायडरनी या प्रकरणाचा बोध काय हे सांगताना लिहिलं होतं,

 “प्रत्येक प्रशासकानं आपलं काम चोख करावं हे अपेक्षित आहे. त्यासाठीच त्याला जनतेच्या करातून जमा होणा-या पैशातून पगार व पर्स दिले जातात. चंद्रकांतनं फार काही जगावेगळं केलं असं मी म्हणणार नाही. त्यानं आपलं कर्तव्य चोख बजावलं. पण तोच त्याचा अपराध ठरावा व त्याची तडकाफडकी बदली व्हावी ही शोकांतिका म्हणायला हवी. पण त्याचे समाजमनाला भान आहे का?"

३३८ । लक्षदीप