या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भरीव बदल घडवून आणले, कैद्यांना सकारात्मकता शिकवण्यासाठी नानाविध उपाययोजना केल्या. उदा. योगाचे वर्ग, अभ्यास केंद्र आणि कारागीर प्रशिक्षण, त्यांना त्यामुळे मॅगसेसे पुरस्कार मिळाला. आज देशभरात तुरुंग प्रशासनात बरेच बदल झाले आहेत, त्याचे मोठे श्रेय किरण बेदी यांना दिले पाहिजे.
६. निळी हॅट काय सांगते?
 स्वातंत्र्योत्तर साठ वर्षांत भारतीय प्रशासनाच्या वाटचालीकडे पाच भिन्न हॅटस् घालून, त्यावर आपण क्ष-किरण टाकले आहेत. आता सहावी हॅट घालून पाहायचे आहे. प्रत्येक हॅट ही आपापल्या परीने खरी व बरीचशी वस्तुनिष्ठ आहे.
 येथे मला ‘राशोमन' या सिनेमाची आठवण येते. त्यात एकच घटना भिन्न भिन्न माणसांच्या कथनातून दाखवली आहे. तसेच या पाच हॅटच्या दृष्टिकोनाचे आहे. निळी हॅट घालून बघताना प्रत्येक हॅटचा दृष्टिकोन व त्यातली वास्तवता - तथ्यांश समजून घेऊन, त्यातून एकसंध चित्र निर्माण करायचे आहे. ते खरेच कठीण काम आहे. कारण पुन्हा येथे प्रत्येकाच्या विचारात या पाच हॅटस् डोकावतील आणि पुन्हा ‘राशोमन होईल.
 निळी हॅट घालून ब्यूरॉक्रसी नेमकी कशी आहे, या साठ वर्षांत तिने कार्य योगदान भारतीय विकास प्रक्रियेत दिले, तिचे एकविसाव्या शतकात काय स्थान आहे, तिची उपयुक्तता उदारीकरणामुळे कमी झाली किंवा संपुष्टात आली आहे काय, यावर विचारमंथन होणे आवश्यक आहे. ते काम मी वाचकांवर सोडून देऊ इच्छितो. कारण मी एक प्रशासक आहे, त्यामुळे कदाचित वस्तुनिष्ठपणे निळी हॅट घालून पाच हॅटस्च्या दृष्टिकोनातून एकसंध व वास्तव चित्र निर्माण करू शकणार नाही.
 वाचकहो, तुम्ही आता निळी हॅट घाला आणि तपासा भारतीय प्रशासन व्यवस्था.

०-०-०-
३७० ■ लक्षदीप