या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पनेतून त्यांना बाहेर यावेच लागेल. नव्या शतकातील प्रशासकांचा बदललेला रोल कसा असेल? त्याबाबत यु. पी. एस. सी. चे चेअरमन लेफ्टनंट जनरल (सेवानिवृत्त) सुरिंदर नाथ म्हणतात. "There is realization that at this juncture we need candidates with the necessary intellectual and attitudinal caliber who can be facilitators. disseminators of information and agents of change. The new bureaucrat should be seen as a "Knowledge Manager" - a modern day trouble shooter who can take decisions after consulting every interest group, not autocratically as was being done yesterday."
 आज मोठ्या कष्टाने, जिद्दीने व मेहनतीने प्रशासनात आलेल्या व येऊ घातलेल्या बहुजन समाजातील प्रशासकांपुढे सिस्टिम बदलण्याचे ध्येय आहे, कारण त्यांनी त्याचा त्रास भोगला आहे. त्यांना राष्ट्र व समाजउभारणीत योगदान द्यायचे आहे, कारण शासनाच्या ध्येयधोरणाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा ब्यूरॉक्रसी आहे हे त्याना चांगले माहीत आहे, पण आजची गुंतागुंतीची अर्थव्यवस्था, राजकीय अस्थिरता, आघाड्यांचे राजकारण आणि पॉप्युलिस्ट घोषणांमुळे बदलत्या परिस्थितीशी मिळवून घेत कसे काम करायचे हे त्यांना शिकता आले पाहिजे. तसेच वाढते शहरीकरण, तापमानातील बदल व त्याचे दुष्परिणाम, दहशतवाद, हिंसाचार, मोकाट भांडवलशाही आणि शोषणाची बदलती रूपे समजून घेत त्यांचा मुकाबला करण्यासाठी त्यांना नवीन कौशल्ये व मानसिकता आत्मसात करावी लागणार आहेत आणि मुख्य म्हणजे आज शासनाचा सामाजिक क्षेत्रात जो वाढता सहभाग आहे - मग ते शिक्षण असो, आरोग्य सेवा असो वा महिला बालकल्याण, क्रीडा व युवक कल्याण... त्यामुळे ख-या अर्थाने मानवी विकास होणार असल्यामुळे तेथे कल्पकता, जिद्द व बांधिलकीच्या भावनेतून काम करण्यात त्यांनी विशेष रस घेतला पाहिजे. दलित, आदिवासी व अल्पसंख्याक तसेच अपंग विभागात / मंत्रालयात काम करण्यासाठी त्यांनी तत्परतेने पुढे आले पाहिजे, तरच आज जातीय / प्रांतीय समीकरणाप्रमाणे बदललेला भारतीय प्रशासनाचा चेहरा अधिक प्रातिनिधिक व देशहिताचा होईल. ख-या अर्थाने लोककल्याणकारी कारभारासाठी व नागरिकांच्या अपेक्षापूर्तीसाठी नागरी सेवेची यंत्रणा उपयुक्त सिद्ध होईल.

 हे आव्हान स्वीकारायचे आहे मोनिका दहिया, पूनम मलिक, संदीप कौर, कृष्णात पाटील, फैजल शहा आदींनी. ते ज्या वर्गातून, ज्या कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या जोरावर इथवर आले आहेत - खचितच ते बदललेल्या प्रशासनाला चांगला चेहरा व मन - सूरत व सीरत - देऊ शकतील!

३७८ ■ लक्षदीप