या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. कलरफुल


 जेव्हा जेव्हा मी 'नवरंग' सिनेमाची सप्तरंगाची उधळण करणारी गाणी टी. व्ही वर पाहातो, मला व्ही. शांतारामनी या सिनेमाची त्यांना कशी प्रेरणा मिळाली याची सांगितलेली कहाणी आठवते. ‘दो आँखे बारह हाथ' या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी बैलाशी झुंज देण्याचा शॉट चित्रित करताना त्यांच्या डोळ्याला इजा होऊन काही काळ अंधत्व आलं होतं व एकच रंग त्यांना कळत होता. अंधाराचा काळाकुट्ट रंग. त्यामुळे त्यांना नव्यानं रंगाचं अप्रूप जाणवत होतं. बरं होऊन पुन्हा दृष्टी येताच त्यांनी रंगांची विलोभनीय उधळण करणारा संगीतमय ‘नवरंग' सिनेमा निर्माण केला. तो पहाताना त्यातील गीत-संगीत एवढीच रंगांची नजरेचं पारणं फेडणारी आतशबाजी आजही प्रेक्षकांना स्तिमित करते.
 असाच निसर्गाच्या मनोवेधक रंगपंचमीचा अनुभव मला अमेरिकेत असताना सिरॅक्यूस (न्यूयॉर्क) ते नायगरा या सुपरहायवेवरून प्रवास करताना काही वर्षांपूर्वी ऑक्टोबर महिन्यात आला होता. हा तेथला पानगळीचा मोसम, विविध झाडांची पाने रंग बदलत गळून पडतात. हिरवी, लाल, पोपटी, निळी, राखाडी यासारख्या असंख्य रंगछटा. हिमर्षावाच्या त्या गोठलेल्या मोसमात धारण करून झाडांना फिल्मी भाषेत सांगायचं झालं तर ‘इस्टमनकलर' करतात. मैल न मैल दुतर्फा रंगीबेरंगी पानांची वृक्षसंपदा, भुरभुरणारा कापसासारखा हिमशुभ्र बर्फाचा पाऊस आणि काळे कुळकुळीत पण गुळगुळीत रस्ते... भन्नाट वेगानं पळणाच्या मोटारी, आणि आ वासलेली नजर आणि त्यात न सामावणारी ती केवळ अप्रतिम अशी रंगसंगती. ओठावर प्रश्न येतो, ही किमया करणारा ‘ये कौन चित्रकार है?'

 आपल्या सभोवती सर्वत्र रंगांची एक विलक्षण अशी दुनिया आहे. त्यामुळे मानवी जीवनही किती रंगतदार बनले आहे नाही? पशू, पक्षी, निसर्ग, वृक्ष - वेली, फुले, फळे, भाज्यांचे विविध रंग केवळ नजर तृप्त करीत नाहीत तर मन - मानसही. आणि माणसाने विज्ञानाच्या साहाय्याने रंग, पेंटस निर्माण करून एकेका रंगांच्या असंख्य छटा निर्माण केल्या आहेत. आणि इंटेरिअर डिझाईनमध्ये रंगसंगती ठरवणे

३८० ■ लक्षदीप