या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा महत्त्वाचा घटक बनला आहे. विद्युत प्रकाशातही मानवी प्रज्ञेने रंग भरून विविध रंगांच्या दिव्यांची थक्क करणारी आतषबाजी केली आहे. जेव्हा आपण एखादा कारंजा पाहातो उदा. वृंदावन, पैठण - तिथं रात्री विद्युत प्रकाशात पाण्याचे आकर्षक रूपे धारण करीत उडणारे फव्वारे क्षणाक्षणाला बदलणा-या रंगछटा दाखवतात, तेव्हा नजर थक्क होते व मन प्रमुदित होतं!
 नुकताच अनिल अवचटांचा भाजीमंडई वरचा एक रंगीत आर्टपेपरवर मुद्रित केलेला रसभरीत लेख दिवाळी अंकात वाचला. गुलाबी गाजरं, हिरवीकंच कोथींबीर,लाल भोपळा, नारिंगी बीटस्, फ्राय केलेला तांबुस लसूण, कोल्हापूरचा पांढरा - तांबडा रस्सा डोळ्यासमोर नाचू लागले आणि केवळ रसनाच नाही तर पंचेद्रिये - नजरेसह मनोमन तृप्त झाली. औरंगाबाद पुणे रस्त्यावर ‘स्माईल स्टोन' या मोटेलमध्ये विविध खाद्यपदार्थांची रंगीत छायाचित्रे लावली आहेत, तेथील तांबुस भाजलेला डोसा, शुभ्र इडली, किंचित काळसर पिवळ्या रंगाचं सांबार, ब्राऊन फिल्टर कॉफी, सुवर्णरंगी चहाची चित्रे पाहून ते खाद्यपदार्थ खाण्याचा मोह होतो. ही किमया त्या पदार्थाच्या सदाबहार रंगांची आहे.
 सकाळ्या तेजोमय सूर्योदय, सायंकाळचा संधिप्रकाश, पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशातलं निळे - सावळं आकाश, धुक्यानं वेढलेली हरित पर्वतराशी, ट्युलिपची टपोरी फुलं, (आठवा : सिलसिला सिनेमातलं गाणं - देखा एक ख्वाब तो...) ग्रीन हाऊस मधला जरबेरा व गुलाबांच्या असंख्य रंगछटेची फुलं, श्रावणात ऊन - पावसाच्या बाललीलासम खेळात फुलून आलेलं इंद्रधनुष्य, शुक्राची चांदणी, नायगाराचा फेनिल शुभ्रप्रपात... किती किती रंगछटा आठवाव्यात?
 झालंच तर जी. ए. कुलकर्णीच्या कथा संग्रहातून जाणवणाच्या व मनमानसात घर करणा-या रंगछटा : हिरवे रानवे, निळा सावळा, सांजशकुन इ. इ.; महानाराच्या गीतातला कुसुंबी, ओला हिरवा रंग; साहिरच्या ‘पर्वतों के पेडो पर' या गीतातला ‘सुरमई उजाला' व चंपई अंधेरा'; मंगेश पाडगांवकरांच्या ‘श्रावणात घन निळा बरसला' मधील हळदीचे ऊन सारख्या रंगप्रतिमामधून हे सर्व भाषाप्रभू जो शब्दाचा रंगमहाल उभा करतात तो शांतपणे ऐकावा. त्यातील एक एक रंगप्रतिमा नजरेसमोर आणीत, चित्तामध्ये ठसवीत तिचा आस्वाद घ्या... वाहवा! क्या बात है... जावन कस गुलजार होऊन जातं!

 मानवी रूपसौंदर्याला पण रंगांचं लोभस अस्तर असतंच. निळा सावळा कृष्ण, सस्यशामला द्रौपदी, तांबुस गोळ्या रंगांच्या युरोपियन ललना, ग. दि. मा. चा ‘पावसाळी मेघापरी' सावळा रंग असणारी प्रिया, राजकपूरचे हसू आसूचे मिश्रण असणारे निळे डोळे, राखीचे कोल समुद्रासारखे घारे नेत्र, मीनाकुमारीचे नावाप्रमाणे असणारे काळेशार मीनाक्षी चक्षु, जयाप्रदाच्या सौंदर्याला दृष्ट लागू नये म्हणून

लक्षदीप ■ ३८१