या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असताना तिथे शेख अब्दुल्लांचे व्याख्यान झालं होतं, त्याची आठवण झाली. साडेसहा फुटांची सणसणीत उंची, भरदार बांधा, खास काश्मिरी देखणं रूप, फैज कॅप - शेरवानी असा टिपिकल पोषाख आणि धारदार प्रभावी हिंदी मिश्रित उर्दूमधलं वक्तृत्त्व. ते आपल्या ओजस्वी भाषणानं काश्मीर खोरं पेटवायचे म्हणे; ते वर्णन सार्थ वाटलं होतं मला त्यावेळी, मी ही माहिती ड्रायव्हरला दिली तेव्हा तो सुस्कारा सोडीत म्हणाला, 'वो जाने के बाद सब कुछ बिखर गया, काश....'
 शेख अब्दुल्ला हे काश्मिरी अस्मिता, काश्मिरी ओळख, अर्थातच काश्मीरियतचे प्रतीक असल्याचे अनेक अभ्यासक मानतात. भारतात प्रत्येक राज्यात उपराष्ट्रवाद (Sub Nationalism) आहे, पण तो भारतीय राष्ट्रवादाचा (Indian Nationhood) भाग मानतात. शेख अब्दुल्लांनी मात्र काश्मीरची ओळख उपराष्ट्रवादापुरती न ठेवता ती स्वतंत्र राष्ट्रवादाकडे अथक परिश्रमांतून नेली.

 त्यांच्यासाठी कश्मीरियत ही ऋषी - सूफी परंपरेच्या अभिव्यक्तीपेक्षा स्वतंत्र राष्ट्र संकल्पनेची होती, पण त्यांची व पयार्याने काश्मीरची अशी गोची झाली, की पाकिस्तान त्यांचे स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्व मान्य करत नाही. (आज काश्मीर धगधगता ठेवण्यासाठी ‘आझादी'चं नैतिक समर्थन ही त्याची स्ट्रैटेजी आहे.) आणि पाक आक्रमणाला बळी पडू नये म्हणून भारतात नाईलाजानं विलिनीकरणाच्या दस्तऐवजावर स्वाक्षरी करून सामील होणं शेख अब्दुल्ला व महाराजा हरिसिंग यांना भाग पडलं. भारतीय सैन्यानं काश्मीरच्या रक्षणासाठी कारगिलसह चार युद्धांचा सामना करून आपलं रक्त सांडलं व परमोच्च बलिदान केलं, त्यामुळे भारतीय मानसिकता काश्मीर सोडायला कधीच तयार होणार नाही हे निर्विवाद. त्याचबरोबर काश्मीर हा कश्यप मुनी, बिल्हण, पातंजली व कल्हणची कर्मभूमी म्हणून, सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा भाग म्हणून आणि हिमालय हा भारताचा पूजनीय उत्तर सीमेचा रखवालदार मानीत असल्यामुळे भारतीयांची काश्मीरशी भावनिक, सांस्कृतिक व धार्मिक नाळ जुळलेली आहे. इतिहासाचे काटे मागे फिरवता येत नाहीत, ही वस्तुस्थिती शेवटपर्यंत शेख अब्दुल्लांनी मान्य केली नाही व आज हुरियत नेते पण ती स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नाहीत. मुख्य म्हणजे पाकिस्तानसाठी आजही काश्मीर ‘अनफिनिश अजेंडा ऑफ पार्टिशन' आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताशी बरोबरी करणे (Parity with India) या महत्त्वाकांक्षेनं पाकिस्तान पहिल्यापासून झपाटलेला आहे. भारतात हजार वर्षे राज्य केल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व भारतात मुस्लीम हे किमान हिंदूंच्या बरोबरीचे असावेत असं मानणा-या वृत्तीतून पुढे मोहंमद अली जिनांनी 'द्विराष्ट्रवादा' चा सिद्धान्त (Two Nation Theory) मांडला आणि भारताची फाळणी झाली. पण काश्मीर त्यांच्या १९४८ च्या आक्रमणाच्या आततायी निर्णयानं भारतात सामील झाला आणि हा प्रश्न न भरून येणा-या जखमेप्रमाणे चिघळत गेला.

लक्षदीय ■ ४०५