या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 अरिफ बशीर या 'डेली खिदमत' च्या इंग्रजी दैनिकाच्या सहायक संपादक व लेखकानं वरील प्रसंग वर्णन करून जे स्फुट लिहिलं, त्याचा काही भाग मी खाली उद्धृत करीत आहे.
 ‘आज टागोर हॉलमध्ये काश्मीरियत पुन्हा एकवार जिवंत झाली होती. सर्व प्रकारचा त्रास, मनस्ताप, घाणेरडं राजकारण आणि हिंसा - खून सोसूनही काश्मीर व काश्मिरी जिवंत आहेत. मागील दोन दशकांत काश्मीरियतला अनेक तडे गेले, हीं कट असली तरी वस्तुस्थिती आहे, पण आजच्या कोवळ्या निर्वासित पंडित मुलांच्या गीत-संगीतानं एक बाब निश्चितपणे काश्मिरी मानसावर ठळकपणे अधोरेखित केली आहे, ती म्हणजे पंडित आम्हांस पारखे झाले नाहीत. काश्मिरी भाषा व कश्मीरियत या संस्कृतीनं - जीवनशैलीनं पंडित व खो-यातले मुस्लीम परंपरांशी रेशीमगाठीनं वांधले गेले आहेत. हे धागे सैलावले असले, तरी कधीच तुटणार नाहीत. या कार्यक्रमाच्या वेळी बारामुल्लाचे एक शिक्षक गुलाब नबी गनी यांनी जे म्हटलं, ते किती सार्थ आहे! ‘चौं थ चू येटे, मगर झू चे तौरर' (काश्मिरीं वाक्य) अर्थात 'मुख इथं (काश्मिरी मुस्लिमाकडे) तर जीभ तेथे (काश्मिरी पंडिताकडे)' आहे. त्यामुळे आज जरी पंडित निर्वासित झाले असले व दोन जमातीत काही कटुता व गैरसमज असले तरी या दोन जमाती मन, भावना व संस्कृती - सहअस्तित्वानं एकमेकाशी बांधल्या गेल्या आहेत. ही काश्मीरियतच एक दिवस पंडितांना खो-यात परत आणेल व काश्मीरी मुस्लीम त्यांचे मिठी मारून स्वागत करतील.'
 हा एक साधा प्रसंग एका संध्याकाळचा, गीत संगीताचा, पण तो काश्मीरियतच्या संदर्भात जरा विस्ताराने सांगितला एवढंच.
 २००४ च्या लोकसभा निवडणुकीत श्रीनगरमधून उमर अब्दुल्लाविरुद्ध किशनकुमार खोसी ही ५५ वर्षांचा काश्मिरी पंडित उभा ठाकला होता. त्याच्या शब्दांत सांगायचं झालं तर I have decided to revive the peaceful and harmonious environment of Kashmir. My sole strength is rmy intrinsic faith in kashmiriyat-an ideology that, inspite of violence, is still the way of life for us kashmiries. I also want to restore the values of peace, brotherhood and inter community bond.' किशनकुमारचं निवडणुकीत काय झालं हे सांगायला नको; पण जम्मूत निर्वासित म्हणून राहात असतानाहीं श्रीनगरमधून ‘काश्मीरियत' साठी लढा देण्याचा त्यांचा निर्धार माझ्या मते महत्त्वाचा आहे.
 आता काश्मीरियत ही संकल्पना, तत्त्वज्ञान किंवा जीवनशैली काय आहे हे पाहू या!

 काश्मीरियत ही मूलत: काश्मीर लोकांची एतद्देशीय राष्ट्रवादी जाणीव, सामाईक स्वरूपाचे भान आणि सांस्कृतिक मूल्यांची प्रखर जाणीव असलेली सहअस्तित्वाची

लक्षदीप ■ ४०७