या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहे.'
 'बळी' हे गिरीश कार्नाडांचं मिथकावर आधारित तिसरं महत्त्वांचं नाटक. याचं कथाबीज त्यांनी तेराव्या शतकातील कवी जनाच्या ‘यशोधारा चरितेवरून घेतलं आहे. कार्नाडांच्या मते त्यांचे हे नाटक महात्मा गांधीच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला मानवंदना आहे, जी भारताच्या सांस्कृतिक व राजकीय अस्तित्वासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. ‘बळी' मध्ये प्रेम व हिंसेमधील द्वंद्व आहे. जैन धर्मात कोणत्याही प्रकारची हिंसा त्याज्य आहे. या उलट हिंदू धर्मासाठी मध्ये यज्ञयागात पशुबळीला महत्त्वाचे स्थान आहे व त्यांना यातील हिंसा मान्य आहे. त्याविरुद्ध जैन व बौद्ध धर्माने इतिहासात बंड केल्याचा दाखला आहे. प्रस्तुत नाटकाचा गाभा असलेल्या मिथकामध्ये प्रत्यक्ष हिंसेपेक्षाही प्रतीकात्मक हिंसेचा प्रश्न व त्यातून प्रकटणारी नैतिक समस्या अनुस्यूत आहे. ‘यशोधारा चरित' मध्ये पिठाचा कोंबडा करून त्याचा प्रतीकात्मक बळी देण्याची घटना आहे. प्रत्यक्ष हिंसा नसली तरी याद्वारे होणारी प्रतीकात्मक हिंसाही एकप्रकारे हिंसाच आहे व ती अमानवी पशुवृत्तीची आहे. कार्नाडांच्या प्रतिभेला हे प्रतीकात्मक हिंसेचे रूपक आकर्षित करीत होते व त्यातून या नाटकाची निर्मिती झाली आणि त्याद्वारे प्रेम, मत्सर, इच्छा, विश्वासाघात व स्त्री-पुरुषाच्या नात्यातली हिंसा सुजाण तात्त्विक पातळीवर कार्नाडांनी 'बळी' मध्ये ताकदीनं मांडली आहे
 या नाटकाचं कथानक थोडक्यात सांगायचं झालं तर, नाटकाची नायिका राणी ही जैन धर्मीय, पण विवाह हिंदू राजाशी झालेला. तिच्या प्रेमासाठी त्यानं जैन धर्म स्वीकारला खरा, पण त्यातली तत्त्वं त्यानं पूर्णपणे अंगीकारलेली नाहीत. राजमाता मात्र कट्टर हिंदू आहे व यज्ञातील पशुबळीवर पूर्ण विश्वास असलेली आहे. राणी सुमधुर आवाजावर मोहित होऊन हलक्या जातीच्या कुरूप माहुताशी शरीरसंबंध जोडते. पण जैन धर्म व अहिंसा स्वीकारलेल्या राजाला माहुताला मारणं शक्य नसतं, पण व्यभिचारामुळे देवतेचा होणारा कोप बळी दिल्याखेरीज शांत होणार नाही ही राजमातेची ठाम भावना असते. त्यामुळे पिठाचा कोंबडा करून त्याचा प्रतीकात्मक बळी देण्याचा निर्णय होतो. पण अचानक पिठाच्या कोंबड्यात प्राण येतो व तो खरा बळी ठरतो, जो जैन धर्माला निषिद्ध आहे व शेवटी राणीला बलिदान करावं लागतं. असं हे हिंसा- अहिंसेचं द्वंद्व या नाटकाचं कथासार म्हणता येईल.
 हे हिंसा-अहिंसेचं द्वंद्व आजच्या काळात किती महत्त्वाचं आहे व अमर्याद हिंसेच्या कालखंडात महात्मा गांधीचे अहिंसेचे तत्त्वज्ञान मानवजातीसाठी किती महत्त्वाचे आहे हे वेगळे सांगायला नको आणि हिंसा ही कृतीत येण्यापूर्वी मनात निर्माण होते व प्रतीकात्मक हिंसेचा विचारही प्रत्यक्ष हिंसेइतकाच विनाशकारी असतो, हे या नाटकातून गिरीश कार्नाडांनी मोठ्या ताकदीनं मांडलं आहे.

 तसंच राणी व तथाकथित खालच्या जातीच्या माहुताशी विवाहबाह्य संबंधाद्वारे

४४२ ■ लक्षदीप