या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एच. जी. वेल्सचा ‘द आउटलाइन ऑफ वर्ल्डस हिस्टरी' हा ग्रंथ वाचून मी उत्तेजित झालो होतो. मी का जगाचा इतिहास लिहू नये, असा विचार करत पाच-सहा वह्या भरून टिपणंही काढली होती. त्या वह्या अजूनही माझ्यापाशी आहेत. त्यामुळे नाटकीय कथावस्तूच्या शोधात इतिहासाची पुस्तकं वाचायची, ही काही फार मोठी समस्या नाही.
 मी लगोलग लायब्ररी गाठली. भारताच्या इतिहासाचं एक सोपं पुस्तक हातात घेतलं. मोहेंजोदारोपासून सुरुवात केली. वाचत गेलो. मौर्य, यवन, हूण, गुप्त,पल्लव, चोळ या सगळ्यांना पचवत मी चौदाव्या शतकातल्या महम्मद तुघलकच्या कारकिर्दीपर्यंत येऊन पोहोचलो. तिथे मी शोधात असलेली सामग्री माझीच वाट पाहत होती; महम्मद तुघलकचा 'वेडा' कारभार!
 अस्तित्ववादात देव हेही एक पात्र असतं. मानव आणि देव यामधला संबंध ही तिथे तपासलेली एक महत्त्वाची समस्या होती. महम्मद तुघलकाविषयी वाचत असताना त्याच्या जीवनातल्या दोन घटनांनी मला एकाएकी आकर्षित करून घेतलं.
 एक, दिल्लीवर राज्य करणाच्या सगळ्या सुलतानांमध्ये तो अत्यंत प्रतिभावान असला तरी अखेरीस तो त्याच्या समकालिनांच्या नजरेत, भवितव्याच्या दृष्टीनं वेडाच मानला गेला.
 दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं आपल्या राज्यकारभाराच्या काळात सुमारे पाच वर्षं सार्वजनिक प्रार्थना थांबवली होती. हे ज्या क्षणी वाचलं, त्या क्षणी मी रोमांचित झाल्याचं आजही मला आठवतं. त्यावेळी मी स्वत:ला नास्तिक मानत होतो. तुघलकाची चकित करणारी ही योजनाही त्याच्या नास्तिकतेतून आली आहे, असा मला तेव्हा विश्वास वाटला. पण त्याच्याविषयी जास्तीची माहिती मिळवू लागलो, तेव्हा त्याच्या मनातल्या धर्माविषयक घुसळणीतून ही घटना घडली असेल, असं मला जाणवू लागलं. देवावर विश्वास ठेवणं ही साधी गोष्ट नव्हती. ती एक कठीण तपस्या होती."

 कार्नाडांच्या मते ‘तुघलक' ही ऐतिहासिक नाटकासाठी एक बहुआयामी नाट्यपूर्ण व्यक्तिरेखा होती. दिल्लीवर राज्य करणाच्या सुलतानातला हा सर्वांत बुद्धिमान तसंच सर्वात अयशस्वी सुलतानही. तो काळाच्या पुढं होता, पण त्याच्या कारकिर्दीचा शेवट रक्तपात व अराजकतेनं झाला. हे नाटक १९६४ मध्ये कार्नाडांनी लिहिलं. पंडित नेहरूच्या मृत्यूला एक वर्ष झालं होतं. आणि स्वातंत्र्योत्तर कालखंडातील पहिल्या पंधरा वर्षातच नैतिक हास व ज्या मूल्यांसाठी भारतीय स्वातंत्र्यलढा लढला गेला, त्यांची घसरण जाणवू लागली होती. नेहरू पण तुघलकप्रमाणे आदर्शवादी होते व काहीसे अव्यवहारी. त्यांच्या आदर्श योजनांचा गैरफायदा काँग्रेसजन घेताना दिसत होते. कार्नाडांचा नाट्यविषय कोणताही असला तरी त्याचा वर्तमानाशी व आजच्या प्रश्नांशी जोडण्याकडे स्वाभाविक कल होता, त्यामुळे ‘तुघलक'द्वारे स्वातंत्र्योत्तर

४४४ ■ लक्षदीप