या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सामाजिक प्रश्नाची अस्सल जाणीव दिली म्हणून. मानवी जगणं व दु:ख - धगीचा एक अज्ञात पैलू शिवाजी पाटलांनी ताकदीनं मांडला. हा चित्रपट मनाला त्रस्त करतो.समंधाप्रमाणे मानगुटीवर बसतो. त्यामुळे मनोरंजनाची अपेक्षा करणा-या भारतीय प्रेक्षकांना - जे बॉलिवुडी सिनेमाचे ‘अॅडिक्ट' झाले आहेत, त्यांना कितपत पचेल, हा प्रश्नच आहे. पण सिनेमानं केवळ मनोरंजनच केलं पाहिजे असा काही नियम आहे का? पुन्हा प्रेम, रहस्य, हाणामारी व सेक्स म्हणजेच मनोरंजन? जे तुम्हाला दोन तास खिळवते, मेंदूचा भुगा करते... ते मनोरंजन नसेल, पण मनोवेधक तर आहे ना? रंजन हेच कला-साहित्याचं एकमात्र प्रयोजन मानायचं? तर मग शेक्सपिअरच्या ट्रेजेडीज हद्दपार कराव्या लागतील. म्हणून प्रेक्षकांनी पण असे वेगळे प्रयोग - वेगळे विषय स्वीकारले पाहिजेत, पाहिले पाहिजेत...
 'धग' ती जाणीव करून देतो. प्रेक्षकांच्या अभिरुचीला प्रश्नांकित करीत आव्हान देतो. हाच या सिनेमाचा ‘यूएसपी' आहे. म्हणूनच त्याचा माझ्यावरील प्रभाव दीर्घकाळ टिकणारा असणार आहे.

-०-०-०-
४५८ ■ लक्षदीप